कर्मवीर जयंतीनिमित्त कर्जत रयत संकूलाच्या वतीने शोभायात्रा, श्रमप्रतिष्ठा दिनाचे आयोजन 

0
147
Google search engine

 

दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय व सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘कर्मवीर जयंती सप्ताह व कर्मवीर व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

 

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

 

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर यांच्या प्रतिमेची चित्ररथातून कर्जत शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध महापुरुषांच्या वेशभूषेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. सुभाष कोरडे, प्रा. किरण भोसले यांच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांमार्फत रयत शिक्षण संस्था व कर्मवीर यांच्यावरील घोषणा शोभायात्रेत देण्यात आल्या. ‘रयत शिक्षण संस्थेचा विजय असो, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, कमवा आणि शिका हाच आमचा मंत्र, श्रमाची प्रतिष्ठा हीच आमची निष्ठा’ आदि घोषणांनी कर्जत परिसर कर्मवीरमय झाला. या शोभायात्रेचे संयोजन डॉ. संतोष भुजबळ यांनी केले.

 

दुसऱ्या सत्रात कर्मवीर जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘श्रम प्रतिष्ठा’ दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी वर्ग यांनी एकत्रित येऊन महाविद्यालय व आजूबाजूच्या परिसराची उत्स्फूर्तपणे स्वच्छता केली

 

तिसऱ्या सत्रात कर्मवीर जयंतीनिमित्त वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. वेशभूषा स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. शिल्पा तोडमल व प्रा. मीना खेतमाळीस यांनी तर परीक्षण प्रा. तृप्ती निंबोरे व प्रा. निकिता राऊत यांनी कामकाज पाहिले. वक्तृत्व स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. बाळासाहेब धांडे, प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी तर परीक्षण प्रा. सुखदेव कोल्हे, प्रा. मीना खेतमाळीस यांनी पाहिले. वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे यांच्या हस्ते संपन्न झाले

 

प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागामार्फत २२ सप्टेंबर रोजी शोभायात्रा, श्रमप्रतिष्ठा दिन, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता विशेष मेहनत घेतली