
दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय व सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक विभाग आयोजित ‘कर्मवीर जयंती सप्ताह व कर्मवीर व्याख्यानमालाचे’ आयोजन रयत संकूल, कर्जत यांच्यावतीने करण्यात आले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा जागर व्हावा याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले
२१ सप्टेंबर रोजी एनसीसी व रयत पॅरा मिलिटरी विभागामार्फत ‘कर्जत ते सातारा’ अशी मेजर डॉ. संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण कर्जत शहरामध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त शोभायात्रा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. शोभायात्रेनंतर श्रमप्रतिष्ठा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ सप्टेंबर रोजी चित्रकला व निबंध स्पर्धा, २४ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या वतीने ‘आयडियाचा आविष्कार’ स्पर्धा, प्राध्यापक प्रबोधिनी व रेड रिबन क्लबचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कला अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
कर्मवीर जयंती सप्ताह निमित्त रयत संकूल कर्जतच्या वतीने दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. २५ सप्टेंबर रोजी ‘संस्कार आणि आजची पिढी’ या विषयावर श्री. गणेश शिंदे, २६ सप्टेंबर रोजी ‘मनाची अमर्याद शक्ति व तणावमुक्ती’ या विषयावर दत्ता कोहिनकर, २७ सप्टेंबर रोजी ‘उठ युवका तू जागा हो! शिवचरित्राचा तू धागा हो!’ या विषयावर श्री. प्रशांत देशमुख यांची व्याख्याने संपन्न होणार आहेत. शिवाय २७ सप्टेंबर रोजी भव्य अशा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
२८ सप्टेंबर रोजी दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये, महात्मा गांधी विद्यालय अमृत महोत्सव प्रारंभ, विद्यार्थिनी वसतिगृह विस्तारित इमारत उद्घाटन समारंभ, कर्मवीर जयंती सप्ताह सांगता व हीरक महोत्सव सांगता समारंभाचे आयोजन केले असल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.






