
मा. स्वप्नील रोहिदास वाघ यांची शहराध्यक्ष – कर्जत (जि. अहिल्यानगर) या पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्य कार्यकारिणी बैठक रविवार दिनांक 15 मार्च रोजी एम. इ. टी. कॉलेज बांद्रा (पश्चिम) मुंबई येथे निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
मुंबई एज्युकेशन ट्रस्ट,भुजबळ नॉलेज सिटी, मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. येथे छगन भुजबळ साहेब,आमदार पंकज भुजबळ, यांच्या हस्ते, व मा. खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी समता परिषद जिल्हाध्यक्ष सुभाष जी लोंढे, समता परिषदेचे मा. तालुका अध्यक्ष श्री संतोष गोरे, भाजपा ओबीसी कर्जत मंडळ अध्यक्ष शरद आण्णा म्हेत्रे, भाजपा ओबीसी राशीन मंडळ अध्यक्ष डॉ.विलास राऊत, समता परिषद तालुका अध्यक्ष संभाजी गदादे , तालुका उपाध्यक्ष सुनील खरपुडे हे उपस्थित होते.
ही नियुक्ती दि. १५ मार्च २०२६ पासून लागू असून, संघटनेच्या नियम व कार्यकालानुसार राहणार आहे. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देणे, सामाजिक विषमता दूर करणे, तसेच महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार करणे हे आहे. सामाजिक समता, बंधुता, शिक्षण आणि स्वाभिमानाची जाणीव निर्माण करण्यासाठी परिषद सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. या व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मा. स्वप्नील वाघ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबाबत संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी मा. वाघ यांना लेखी शुभेच्छा देत सांगितले की, “संघटनेच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून कर्जत शहरात समता परिषदेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडाल. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, त्यांना संधी देत संघटन मजबूत कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
मा. स्वप्नील रोहिदास वाघ हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी कधीही सामाजिक मेळावे, जयंती उत्सव, प्रबोधन कार्यक्रम किंवा आंदोलने यांपासून अलिप्त राहणे पसंत केले नाही. सावित्रीमाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव असो, सावता माळी तीर्थक्षेत्र अरण येथील कार्यक्रम असोत, किंवा स्थानिक पातळीवरील मोर्चे, आंदोलने व सामाजिक प्रश्नांसाठीचे उपक्रम असोत—प्रत्येक ठिकाणी त्यांची सक्रिय उपस्थिती आणि सहभाग सातत्याने दिसून आला आहे. त्यामुळेच ते कार्यकर्त्यांमध्ये विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मा. स्वप्नील रोहिदास वाघ यांनी सांगितले की,“अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसारख्या विचारवंत आणि समाजाभिमुख संघटनेची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली, ही माझ्यासाठी अभिमानाची व सन्मानाची बाब आहे. संघटनेच्या ध्येयधोरणांनुसार प्रामाणिकपणे काम करून कर्जत शहरात सामाजिक जागृती, युवक संघटन, शिक्षणविषयक उपक्रम आणि समतेच्या चळवळीला नवी दिशा देण्यासाठी मी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन कार्य करीन.”भुजबळ साहेब हे नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देतात. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच अनेक नव्या कार्यकर्त्यांना संघटनेत संधी मिळून ते समाजकारणात पुढे येत आहेत. मा. स्वप्नील वाघ यांची निवड ही याच विश्वासाची आणि कार्यकर्त्यांवरील भरोशाची प्रचिती असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
या नियुक्तीचे कर्जत शहरासह तालुका व जिल्हा पातळीवर स्वागत होत असून, सामाजिक, शैक्षणिक, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मा. वाघ यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याला नवचैतन्य मिळेल आणि समतेच्या विचारांची चळवळ अधिक व्यापक होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






