शिक्षणशास्त्र महाविद्यालय, घारगाव येथील विद्यार्थिनीला MPSC परीक्षेत यश

0
330
Google search engine

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, घारगाव येथील बी.एड. विभागातील विद्यार्थिनी कु. अश्विनी गणेश लाटे हिने आपल्या कठोर परिश्रम, ध्येयवेड आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अलीकडे जाहीर झालेल्या निकालानुसार तिची महसूल सहाय्यक या पदासाठी निवड झाली असून व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET), ठाणे येथे तिची नियुक्ती झाली आहे.

कु. अश्विनी हिने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाला, कुशल प्राध्यापकवर्गाने दिलेल्या अभ्याससूचनांना आणि पालकांच्या सशक्त पाठबळाला दिले. “महाविद्यालयातील अभ्यासाचे वातावरण, सतत मिळणारे प्राध्यापकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि घरच्यांचा विश्वास नसता तर हे यश शक्य झाले नसते,” असे मत तिने व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रक्रियेला तोंड देताना तिने दाखवलेली चिकाटी आणि प्रामाणिकता हे तिच्या यशामागील प्रमुख घटक ठरले.

संस्थेचे अध्यक्ष माननीय दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, सचिव सौ. अर्चनाताई पानसरे, तसेच रजिस्टर कल्याण शिंदे यांनी या यशाबद्दल कु. अश्विनीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी अध्यक्ष दत्तात्रय पानसरे म्हणाले, “घारगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, अभ्यासाची सातत्यपूर्ण शिस्त आणि कठोर परिश्रम या तीन गोष्टी असतील तर राष्ट्रीय-राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवणे अशक्य नाही. अश्विनीने मिळवलेला हा निकाल ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोटे यांनीही याबाबत समाधान व्यक्त करत कु. अश्विनीचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले, “हे यश फक्त एका विद्यार्थिनीचे नसून आमच्या संपूर्ण महाविद्यालयाच्या शैक्षणिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. प्राध्यापकांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासामुळेच अशी उल्लेखनीय कामगिरी घडते. महाविद्यालयातील सहविद्यार्थ्यांनीही तिच्या यशाचे अभिनंदन करत तिचा मार्ग आदर्शवत असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी तिचा हा निकाल प्रेरणादायी दिशादर्शक ठरत असून, महाविद्यालयाचा लौकिक अधिक उंचावला आहे.अश्विनी गणेश लाटे हिच्या या यशामुळे तिच्यासह संपूर्ण महाविद्यालयाचा अभिमान वाढला आहे.