इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त शिक्षणशास्त्र महाविद्यालय, घारगाव येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

Google search engine

घारगाव – श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, घारगाव येथे इंदिरा गांधी जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. राष्ट्राची एकता, अखंडता आणि सामूहिक बांधिलकी दृढ करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी काव्यवाचन, वकृत्व आणि निबंध लेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय एकता, सामाजिक सौहार्द, लोकशाही मूल्ये आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वगुणांवर आधारित या स्पर्धांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धांमधून छात्रांनी आपल्या प्रतिभेचे उत्कृष्ट सादरीकरण करून देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश अधिक प्रभावी पद्धतीने पोहोचवला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.किशोर निंबाळकर प्राचार्य कृषी महाविद्यालय हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात इंदिरा गांधी यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता व सामाजिक जबाबदारी यांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. देशाच्या प्रगतीसाठी युवकांनी सकारात्मक ऊर्जा, शिस्त आणि कार्यतत्परता जपण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोंटे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी इंदिरा गांधी यांचे नेतृत्व, धैर्य, कणखर निर्णयक्षमता आणि राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. विद्यार्थी हेच देशाचे उज्ज्वल भविष्य असून त्यांनी सामाजिक सलोखा, समानता आणि राष्ट्रनिष्ठा जपून प्रगतीचा मार्ग स्वीकारावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.दत्तकृपा शैक्षणिक संकुलाच्या सचिव सौ. अर्चनाताई पानसरे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे विद्यार्थीच समाजाचे भक्कम आधारस्तंभ ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. शेलार सतीश, प्रा. आहेर गोरक्ष, प्रा. वाघमारे हनुमंत, प्रा. अवघडे वैशाली, प्रा. भोईटे प्रतीक्षा, प्रा. गावडे निखिल आदी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक एम.एड विभाग प्रमुख प्रा.राजश्री शिंदे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्निल शिंदे आणि प्राध्यापक गोरे सत्यम यांनी उत्तम पद्धतीने पार पाडले. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहवर्धक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग आणि देशभक्तीपूर्ण अभिव्यक्ती यामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच ऊर्जायुक्त रूप लाभले. महाविद्यालयात झालेल्या या उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक ऐक्य व सामाजिक सहजीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली व कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने केली.