
श्री क्षेत्र मांदळी येथील युवा व कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले सुधीर बचाटे हे सन्माननीय आमदार रोहितदादा पवार व खासदार निलेशजी लंके यांचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून ओळखले जातात. अलीकडेच कोंभळी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिला राखीव जाहीर झाल्याने, दिनकर बंगल्यावरून ‘बॉस’ रोहितदादा पवार यांचा हिरवा कंदील मिळाला तर पत्नी सौ. संघमित्रा सुधीर बचाटे यांना निवडणूक लढविण्याची तयारी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
सुधीर बचाटे हे शेतमजुराच्या घरातून आलेले असून, स्वतःच्या मेहनतीने व आई-वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी आयटी क्षेत्रात उच्चशिक्षण प्राप्त केले. मात्र शिक्षणानंतर नोकरीच्या ऐवजी समाजकारणाची वाट निवडत २०२० साली राजकारणात पाऊल ठेवले. त्या काळात त्यांनी मांदळी ग्रामपंचायतीत लढत देत चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला आणि लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.
ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर बचाटे यांनी गावातील विकासकामांचा धडाका लावला — सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, हायमास्ट दिवे, पाणीपुरवठा योजना अशा अनेक प्रलंबित कामांना गती दिली. गावातील सामाजिक प्रश्न सोडवताना, शेतकऱ्यांचे विमा, नुकसानभरपाई यासाठी आमदार दादांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला.
सुधीर बचाटे यांच्या पत्नी सौ. संघमित्रा या सुद्धा उच्चशिक्षित असून त्यांनी आईसाहेब सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटातून महिलांना शिलाई मशीनचे वितरण, रोजगार निर्मिती व स्वावलंबनाचे उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे महिला वर्गातही त्यांचा चांगला जनसंपर्क आणि विश्वास निर्माण झाला आहे.
सुधीर बचाटे हे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात. शालेय मुलांना साहित्य वितरण, झाडे वाटप, गरजूंसाठी मदत, वॉटर बॅग वाटप अशा उपक्रमांनी त्यांनी समाजाभिमुख कार्याची पायाभरणी केली आहे.
स्थानिक नागरिक, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नेतेमंडळींमध्ये सुधीर बचाटे यांचा चांगला दबदबा असून, त्यांच्या कार्यशैलीबद्दल सर्वत्र समाधान आहे. त्यामुळे दिनकर बंगल्यावरून ‘बॉस’ रोहितदादा पवार यांचा आदेश मिळाला तर कोंभळी पंचायत समिती गणात सौ. संघमित्रा सुधीर बचाटे यांचे उमेदवारी निश्चित असल्याचा जनतेत विश्वास व्यक्त होत आहे.
“बॉस म्हणतील तिथेच मैदानात उतरणार, समाजसेवेचा वारसा कायम ठेवणार,” असे सुधीर बचाटे यांनी सांगितले






