
कोरेगाव जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सौ. राजनंदिनी दादासाहेब (जयवंत) फाळके पाटील यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते नामदेव एकनाथ गलांडे आणि अजय लांडघुले यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून हे स्पष्ट झाले आहे.
फाळके पाटील कुटुंबाचा कोरेगाव परिसरात गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यात मोठा सहभाग राहिला आहे. “लोकशाहीतील आदर्श उमेदवार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे फाळके पाटील कुटुंब”, असे मत नामदेव गलांडे आणि अजय लांडघुले यांनी व्यक्त केले.
राजकीय स्वार्थासाठी पदांचा वापर न करता, समाजकार्यासाठी समर्पित राहणारे आणि सार्वजनिक निधीचा योग्य उपयोग करून विकासाचा पाया मजबूत करणारे कुटुंब म्हणून फाळके पाटील परिवार ओळखला जातो. राज्य आणि जिल्हा पातळीवरील राजकारणातील घसरलेली नैतिक मूल्यं पाहता, फाळके पाटील कुटुंब हे सुसंस्कृत, आदर्श आणि तत्वनिष्ठ राजकारणाचे प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कुटुंबात अनेक वर्षे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मा. राजेंद्र फाळके पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात कोरेगाव गटात उच्चांकी बंधारे, शाळा खोल्या, संरक्षणभिंती, आरोग्य केंद्रे, तसेच विद्युतिकरणाचे जाळे उभारले गेले. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, गरीबांना वैद्यकीय सुविधा, आणि मुलांना शिक्षणाची उपलब्धता मिळाली.
“फाळके पाटील कुटुंबाने विधायक, शाश्वत आणि दुरगामी दृष्टीकोनातून कामे केली असून, आजही त्यांचा लाभ कोरेगाव पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिक घेत आहेत,” असे गलांडे यांनी सांगितले.
फाळके पाटील परिवारात सौ. राजनंदिनी फाळके पाटील या सुशिक्षित, समाजाभिमुख आणि कार्यकर्त्यांमध्ये अपार लोकप्रिय आहेत. जनसंपर्क, संवादकौशल्य आणि सामाजिक जाण या त्यांच्या प्रमुख जमेच्या बाजू असल्याने स्थानिक कार्यकर्ते व जनतेमध्ये त्यांना उमेदवार म्हणून पुढे करण्याची मागणी वाढत आहे.
या परिवाराची खासियत म्हणजे, योग्य सल्ला देणे, समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे आणि एखाद्याने चांगले काम केले तर त्याला पुढे नेणे, तसेच चुकीच्या वाटेवर गेल्यास परावृत्त करणे. फाळके पाटील कुटुंबाने स्वच्छ चारित्र्य, पारदर्शकता आणि विकासाची निष्ठा यांवर आधारलेले राजकारण केले आहे.
आज हे कुटुंब केवळ गाव आणि तालुक्यापुरते मर्यादित न राहता, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात राज्य तसेच देशाच्या आर्थिक राजधानीपर्यंत पोहोचले आहे. तरीही त्यांनी आपली साधेपणा, अपुलकी आणि सामान्य माणसाशी असलेली नाळ कायम राखली आहे.
फाळके पाटील प्रेमी परिवाराचे जेष्ठ नेते मा. शिवाजीराव फाळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परिवाराची पुढील वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सौ. राजनंदिनी फाळके पाटील यांच्या उमेदवारीसाठी तयार झालेले अनुकूल वातावरण हे कोरेगाव गटातील मतदार व कार्यकर्त्यांचा विश्वास व कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गलांडे व लांडघुले यांनी सांगितले.
“समाजकारणात निष्ठा, स्वच्छता आणि सेवाभाव हेच फाळके पाटील कुटुंबाचे ब्रीद असून, अशा पार्श्वभूमीवर राजनंदिनी वहिनीसाहेब यांना उमेदवारी मिळाल्यास कोरेगाव गटाचा विकास नव्या उंचीवर जाईल,” असे दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमुखाने सांगितले.






