
आपल्या कार्यकाळात आदर्श सरपंच म्हणून नाव कमावलेले, सामाजिक व विकासकामांचा ठसा उमटवणारे, तसेच कुस्तीच्या मातीशी घट्ट नाते असलेले पैलवान काकासाहेब शेळके यांनी कोरेगाव गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला आरक्षण असल्याने त्यांच्या सौभाग्यवती पुनम काकासाहेब शेळके या कोरेगाव गटातून निवडणूक लढवणार आहेत.
ग्रामविकास, खेळ क्षेत्र आणि सामाजिक कार्य या तिन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेळके यांच्या उमेदवारीमुळे कोरेगाव गटात चुरस वाढणार आहे.
लाल मातीच्या आखाड्यातून अनेक राष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडवणारे आणि स्वतःही राष्ट्रीय खेळाडू असलेले पै. काकासाहेब शेळके यांनी केवळ कुस्तीच्या मैदानावरच नव्हे तर ग्रामविकासाच्या आघाडीतही भक्कम कामगिरी करून दाखवली आहे. कोरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांनी गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिले. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, लोकसहभाग आणि विकासाचा वेग यांचा उत्तम संगम साधल्यामुळे त्यांच्या कार्यकाळाकडे ‘आदर्श ग्रामपंचायत प्रशासन’ म्हणून पाहिले जाते.
त्यांच्या नेतृत्वाखाली गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे , अनेक सुविधा उभारण्यात आल्या.
पैलवान काकासाहेब शेळके यांचे सर्वपक्षीय मैत्रीपूर्ण संबंध हे त्यांचे वैशिष्ट्य. विकासासाठी पक्षीय विचारांपलीकडे जात काम करण्याची त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कोरेगाव गटात त्यांचा जनसंपर्क अत्यंत मजबूत असून सर्व वयोगटातील लोकांमध्ये त्यांना अपार लोकप्रियता आहे. विशेषतः युवकांमध्ये त्यांचा प्रभाव उल्लेखनीय आहे. जय ई मोटर्स या त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी केवळ व्यवसायिक यशच नाही तर जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले आहेत.कोरेगाव गटात व तालुक्यात त्यांचे मोठे नात्यागोत्याचे जाळे आहे.
सामाजिक आणि सांप्रदायिक कार्यातही ते मागील पंचवीस वर्षांपासून अग्रेसर आहेत. विविध सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिरे आणि धार्मिक उत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत.
राजकारणातही त्यांचा प्रवास तितकाच दृढ आणि स्थिर आहे. आ. रोहित दादा पवार यांचे ते विश्वासू, एकनिष्ठ आणि कट्टर समर्थक असून दादांच्या मार्गदर्शनाखाली ते सातत्याने जनतेच्या प्रश्नांवर लढा देत आहेत. गावकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण आणि स्थानिक विकासासाठी ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.
आता जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरल्याने कोरेगाव गटातील राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता आहे. ग्रामविकासाची परंपरा पुढे नेण्याच्या निर्धाराने आणि जनतेच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून पैलवान काकासाहेब शेळके यांनी ही लढत उभारली आहे. त्यांच्या जनसंपर्काची व्याप्ती, कार्यक्षमतेचा ठसा आणि सर्वसमावेशक नेतृत्वशैलीमुळे ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
“गटाचा विकास, युवकांना दिशा आणि समाजात एकता – हीच माझी निवडणूक जाहीरनामा,” असे सांगत पैलवान काकासाहेब शेळके यांनी प्रचाराचा नाराही दिला आहे.
कोरेगावच्या जनतेतून या निर्णयाचे स्वागत होत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत “आदर्श सरपंच” म्हणून नाव कमावलेले पैलवान काकासाहेब शेळके पुन्हा एकदा जनतेच्या मनावर राज्य करणार, अशी व्यापक चर्चा गावागावात सुरू आहे.







