मिरजगाव पंचायत समिती गणातून सौ. मंदाताई तनपुरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून निवडणूक लढवणार

Google search engine

मिरजगाव परिसरात येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून सौ. मंदाताई रामदास तनपुरे यांना मिरजगाव पंचायत समिती गणातून उमेदवारीचा ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले असून, या निर्णयामुळे मिरजगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे शहराध्यक्ष रामदास तनपुरे यांचे सामाजिक कार्य, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि जनहिताची भूमिका लक्षात घेऊन पक्षाने सौ. मंदाताई तनपुरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तनपुरे दांपत्याने गेल्या काही वर्षांत गावातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांकडून होत आहे.

रामदास तनपुरे यांनी कुठलाही राजकीय वारसा नसताना फक्त सामाजिक कार्याच्या जोरावर पक्षात स्थान मिळवले. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने यापूर्वी त्यांची कर्जत तालुका निरीक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, तसेच अंध, अपंग आणि दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे.

या पार्श्वभूमीवर सौ. मंदाताई तनपुरे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत तसेच ग्रामपातळीवर मोठा प्रतिसाद मिळत असून, महिला सक्षमीकरणाचा हा एक प्रेरणादायी नमुना ठरत आहे. पक्षाच्या गडात महिलांना स्थान देण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा अजित पवार गटाचा हा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे.

सौ. मंदाताई तनपुरे यांनी पक्षाच्या विश्वासास पात्र ठरवून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले. “जनतेने आम्हाला संधी दिल्यास, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, गरीब, शेतकरी, कामगार, महिला, अंध अपंग आणि दिव्यांग बांधवांसाठी प्रामाणिक सेवा करण्याचे कार्य मी करणार आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मिरजगाव पंचायत समिती गणात या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या संघटनाला नवचैतन्य प्राप्त झाले असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत सौ. मंदाताई तनपुरे या पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरतील, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.