न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये दिंडी सोहळा जल्लोषात साजरा

Google search engine

काल ५ जुलै रोजी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात कर्जत शहरातील न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले. रिमझिम पावसामध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणच देखिल ईथे आयोजन करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.

एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी शाळेत मध्ये अवतरले. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.

असा हा सुंदर सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. किरण नाईक (समन्वयक ) , श्री .शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक, वृंद यांनी बहुमोल योगदान देत दिंडी सोहळा जल्लोषात आयोजित केला.