अळसुंदे विद्यालयात अवतरली अनोखी विद्यार्थी, पालक व शिक्षक वारकरी दिंडी

Google search engine

अळसुंदे विद्यालयात अवतरली अनोखी विद्यार्थी, पालक व शिक्षक वारकरी दिंडी

 

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल अळसुंदे विद्यालयात विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या अनोख्या भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी विद्यालयातील तज्ञ विषय शिक्षक ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्यापन करून विद्यार्थ्यांची ज्ञान तृष्णा तृप्त करीत आहेत. परंतु बदलत्या सामाजिक वातावरणात विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता विकसनाबरोबर त्यांच्या भावनिक मानसिक आणि सामाजिक क्षमता विकसित होणे तितकेच महत्त्वाचे आहे यासाठी समाजाची प्रतिकृती असलेल्या विद्यालयात विद्यार्थ्यांना वारीचा अध्ययन अनुभव देऊन त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाचे सचिव सुनील गोरखे यांनी आळसुंदे व देमनवाडी परिसरातील सर्व नागरिक तसेच पालक यांच्याशी संवाद साधून केलेल्या आवाहनातून बहुसंख्य ग्रामस्थ व पालक या अनोख्या पालक विद्यार्थी शिक्षक दिंडी सोहळ्यात उपस्थित राहिले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक विद्यार्थी व शिक्षक यांचा त्रिवेणी संगम होणे गरजेचे आहे त्यासाठी विविध क्लुप्त्यांचा वापर विद्यालय नेहमी करीत असते.

पंढरीची वारी या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या एकत्रित सहकार्याने वारीच्या संस्कृती मधील दिंडी, पाऊली, रिंगण आणि फुगडी या सर्व आनंददायी कृतींमध्ये सर्वांनी सहभाग घेतला.

विद्यार्थिनी , शिक्षक, शिक्षिका पालक व ग्रामस्थ यांच्या मनोरंजक आणि भक्तिमय फुगड्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

अळसुंदे येथील भजनी मंडळातील ह भ प संभाजी शितोळे महाराज, सुखदेव आढाव, वनमाला साळुंके, सुमनबाई अनारसे, स्नेहलता साळुंके, सुलोचना अनारसे, सरस्वती अनारसे यांनी आपल्या सुमधुर अभंग गायनाने समस्त प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि अळसुंदे विद्यालयाचा परिसर विठ्ठल भक्तीत न्हाऊन निघाला.

विद्यालयातील विद्यार्थिनी शक्ती सुरवसे, ज्ञानेश्वरी पालवे, वैष्णवी अनारसे व मुक्ता जाधव यांनी सादर केलेल्या गवळणींना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तसेच विजय निकम यांच्या सुश्राव्य गायनाने विद्यालयाची पवित्र पंढरी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन व सुश्राव्य अभंग गायन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अळसुंदे गावातील शिक्षण प्रेमी नागरिक बापू पाटील व गजेंद्र महाराज साळुंके यांनी वारीसाठी टाळ,विणा,मृदुंग,पालखी यांची सेवा दिली.

याप्रसंगी घेण्यात आलेल्या अभंग गायन व उत्कृष्ट वारकरी पोशाख स्पर्धा घेण्यात आली. भजनी मंडळातील सदस्यांनी पंच म्हणून काम पाहिले. जिंकलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र व भेटवस्तूंचे वितरण भव्य बक्षीस वितरण समारंभात केले जाणार असल्याचे मुख्याध्यापक रामदास परहर यांनी सांगितले.

विद्यालयाच्या वतीने सुनील गोरखे यांनी सर्व भजनी मंडळातील प्रमुख वारकऱ्यांचा वारकरी पंचा,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान केला आणि मान्यवरांचा ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा भावनिक मानसिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी विद्यालय करीत असलेल्या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक रामदास परहर, सुनील अर्जुन गोरखे, रवींद्र विधाते, मोहिनी केदार आणि महेश सप्रे व वारकरी विद्यार्थी यांचे स्थानिक स्कूल कमिटी, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य, सरपंच उपसरपंच व अळसुंदे ग्रामपंचायत सदस्य , विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सदस्य, आळसुंदे व देमनवाडी परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिकांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.