
आकर्षक फुले, विद्युत रोषणाई रांगोळ्यांची सजावट अशा मंगलमय वातावरणात निंबे येथील ग्रामदैवत श्री. संत लिंबाजी महाराज यांचा अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आज पासून प्रारंभ झाला आहे संत लिंबाजी महाराजांच्या दर्शनासाठी राज्यातून हजारो भाविक येणार असल्याची माहिती संयोजक समितीने दिली . कीर्तनसेवेसाठी नवीन सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची कीर्तनसेवा होणार आहे . आज सकाळपासूनच विविध ठिकाणाहून भाविकभक्तांची निंबेकडे रिघ होती. गावातील संत हनुमान मंदिरापासून महाराजांची फुलांनी सजवलेली पालखी ग्रामप्रदक्षिणा करून संत लिंबाजी महाराज मंदिरात दाखल झाली. यावेळी संत लिंबाजी महाराजांच्या गजराने निंबे गाव व आसमंत दुमदुमले होते. आबालवृद्ध व तरुणांनी पालखीच्या दर्शनासाठी यावेळी एकच गर्दी केली होती. त्यानंतर कलश, वीणापूजन व पंचपदी भजनाने सप्ताहास सुरुवात झाली. मंदीर परिसर १२ वाजेच्या सुमारास गर्दीने फुलून गेला होता. वाढत्या उन्हाच्या प्रभावामुळे मंदिर परीसरात ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.मंदिर परिसराचे सुशोभीकरन व वृक्षारोपण झाल्याने मंदिर परिसराचा कायापालट झाला आहे.






