
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यमार्गावरील दुभाजकामध्ये राशीन येथील उद्योजक तथा जय फॅब्रीकेशन चे सर्वेसर्वा माऊली कदम यांनी ८५ वृक्षांची लागवड करून अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली . बारामती-अमरापूर राज्यमार्गावरील दुभाजकात राशीन येथे कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. राशीनमधील व्यावसायिक माउली कदम यांनी शिवजयंतीला टर्मिनिया, हया या जातीच्या ८५ वृक्षांची लागवड या दुभाजकांमध्ये केली. यासाठी त्यांनी लावलेली ही झाडे जिवंत राहावीत यासाठी या झाडांना खते , पाणी देण्याची जबाबदारी स्वतः उद्योजक माऊली कदम यांनी घेतली आहे.
तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील मानव प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले असून वाढती लोकसंख्या , प्रदूषण यामुळे शुद्ध ऑक्सिजन पाहिजे असेल तर वृक्ष लागवड , संवर्धन हा उत्तम पर्याय आहे. वृक्ष आपल्याला फक्त पाने , फुलेच देत नाहीत, तर आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात. वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उद्योजक माऊली कदम यांनी शिवजयंतीनिमित्त राबविलेल्या या उपक्रमाचे राशीन येथील नागरिकांसह वृक्षप्रेमी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. , माऊली कदम यांनी लावलेल्या झाडांमुळे रस्त्याचे रुपडे बदलून गेले आहे.






