
“कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाऊन अभ्यास करण्याची किमया शिवरायांमध्ये होती. राज्यकारभारातील महत्त्वाच्या अठ्ठावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी असामान्य गोष्टी केल्या. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी सारखी जिवाभावाची माणसे सोबत जोडली. शिवरायांनी इतिहास घडवण्यासाठी भूगोलाचा सखोल अभ्यास केला. किल्ल्यांचे बांधकाम गुणवत्तापूर्ण केल्यानेच आजही ते शाबूत आहेत. महाराजांमधील लवचिकता, संघटन कौशल्य, सूक्ष्म नियोजन वाखाणण्याजोगे आहे. महाराजांनी यश अपयश पचवले. राज्यकारभाराची घडी कधी विस्कटू दिली नाही. जीवन चरित्र प्रेरणादायी असल्याने शिवरायांनी दाखविलेल्या वाटेवरून चला’ असे आवाहन सकलशिव प्रतिष्ठान बारामतीचे संस्थापक अध्यक्ष सुहास संजय देशमुख यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व विद्यार्थी विकास मंडळाने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंडोटेक इंडस्ट्रीजचे संस्थापक भाऊसाहेब भापकर, अॅड. योगेश भापकर, सौ. गरिमा देशमुख, संदीप साळुंखे, गणेश जगताप, सुभाषचंद्र तनपुरे, प्रा. प्रकाश धांडे, शशिकांत पाटील, महादेव गांगर्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
याप्रसंगी भाऊसाहेब जंजीरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्वतःच्या प्रगतीसाठी अपमान सहन करा. पैसे मिळविणे हे जीवनाचे कटू सत्य असल्याने व्यावसायिक बनण्याचे आवाहन केले. मोठमोठी स्वप्ने पहा व स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करा. शरीर बलवान बनवून अवांतर वाचन व भाषेवर प्रभुत्व मिळवा. याप्रसंगी त्यांनी शिवचरित्राचे दाखले देत उद्योग कौशल्य विकसित करण्याचे मार्ग सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, मी राजा आहे अशी भावना अत्यंत महत्त्वाची आहे, मी सुद्धा राजा आहे असे ठरवा. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड हे देशातील महत्त्वाचे राजे आहेत. रयतेचे पहिलं महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केले आहे. या जगातील सर्वोत्कृष्ट नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहे . स्वविकासासाठी विविध भाषावर प्रभुत्व असले पाहिजे असे मत व्यक्त केले.
सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरातील छ. शिवाजी चौकात शिवरायांना अभिवादन करून ‘जय शिवाजी जय भारत’ ही पदयात्रा कर्जत शहरातून काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये कर्जतचे तहसीलदार बिराजदार, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, एन.सी.सी. छात्र तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी अॅड. योगेश भापकर यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, आभार प्रा. सुखदेव कोल्हे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा पवार व प्रा. राम काळे यांनी केले.






