कर्जत तालुका प्रतिनिधी :- अशोक सूर्यवंशी

मिरजगाव शहरातील नूतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा द्वितीय पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. डिसेंबर महिन्यात विद्यालयाचा प्रथम पारितोषिक वितरण सोहळा पार पडला होता परंतु यावेळी सर्वच विद्यार्थ्यांना वेळेअभावी पारितोषिक वितरण करणे शक्य नसल्याने विद्यालयाचे प्राचार्य श्री. श्रीमंदिलकर दत्तात्रय यांनी विद्यालयातील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करता यावं यासाठी द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला. यामध्ये शालेय स्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर,राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरची पारितोषिक वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या द्वितीय पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक छगन हिंगणे यांनी केले. यानंतर कार्यक्रमाचे स्वागतगीत संगीत रत्न, संगीत अलंकार संजय तुपे सर , हार्मोनियम वादक श्री. संतोष नलगे सर , तबलावादक तनिष्क चुंबळकर व विद्यालयाच्या विद्यार्थिनी यांनी सुरेल आवाजामध्ये स्वागत गीताचे गायन केले. कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना गीतांजली चेडे मॅडम यांनी मांडली, त्यास प्राध्यापक नरुटे सर यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचा परिचय श्री. संजय चाकणे सर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान. प्राध्यापक श्री. गणेश करे पाटील संस्थापक अध्यक्ष यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था पुणे, प्रसिद्ध व्याख्याते व समाजसेवक यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष, शालेय समिती सदस्य सर्जेराव बावडकर सर यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्षांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्री. श्रीमंदिलकर सर यांनी केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित रुरल एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव अंजलीताई चेडे मॅडम, जिल्हा परिषद सदस्य गुलाब काका तनपुरे, डॉ. भाऊसाहेब मोटे, प्राचार्य. डॉ.जयवंत म्हेत्रे, वैशाली त्र्यंबके मॅडम व सर्व सन्मा. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गणेशजी करे यांनी प्रथमता रूरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. ए.बी चेडेसाहेब यांच्या शैक्षणिक,सामाजिक, आणि राजकीय कार्याचे तोंड भरून कौतुक केले. आई-वडील हे जगातील सर्वश्रेष्ठ दैवत आहेत. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. जो आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवतो तो जीवनात निश्चितच यशस्वी होतो. जो आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत नाही तो आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पाच एलईडी टीव्ही संच गणेशजी करे यांनी देऊ केले. गणेशजी करे यांच्या व्याख्यानाने शिक्षक, विद्यार्थी व व्यासपीठावरील मान्यवर मंत्रमुग्ध झाले होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सर्जेराव बावडकर सर यांनी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे , शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच डॉ.ए.बी. चेडे साहेब यांच्या कार्याचे कौतुकही केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यात सातत्याने पारंगत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुखातिथी व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. दत्तात्रय श्रीमंदिलकर, उपप्राचार्य जयंत चेडे , पर्यवेक्षक छगन हिंगणे , नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सूर्यवंशी, ज्येष्ठ लिपिक महादेव भुजबळ, संजय तरटे, वाघमारे भाऊसाहेब, वीर भाऊसाहेब, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. घरगुती गॅस वापर करत असताना तो काळजीपूर्वक कसा वापरला पाहिजे याबाबत तनपुरे गॅस वितरण चे अधिकारी मिश्रा साहेब यांनी गॅस वापराबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरण सोहळ्याचा समारोप करत असताना आदर्श क्रीडा शिक्षक श्री शांताराम वाडकर सर यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. श्री शांताराम बावडकर सर यांनी वंदे मातरम घेतले. या छान, सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय चाकणे यांनी केले.






