
शहरातील सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेता यावे, विद्यार्थ्यांनी आपले सामाजिक भान जपण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण व्हावी, यासाठी मिरजगाव येथील ‘ श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस ‘ च्या संचालिका प्रा.सौ मृणाली गणेश चव्हाण मॅडम यांच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर सामूहिक पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.
पाश्चात्त्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीबरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे. वाढदिवसाला औक्षण करण्याची पद्धत बदलून त्याची जागा केक कापणे आणि मेणबत्ती फुंकणे यांसारख्या पाश्चात्त्य पद्धतींनी घेतली. मात्र या परंपरेला फाटा देत श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मिरजगाव येथील दत्त गल्ली परिसरातील विद्यार्थ्यांसोबत खेळ, कला सादरीकरण आणि अल्पोपहार याच्या माध्यमातून आनंदाने वाढदिवस साजरा केला.
सुशिक्षित होणे म्हणजे फक्त पाठय़पुस्तकातील प्रकरणांची घोकंपट्टी करणे नसून आपल्या समाजातील विविध घटकांशी बांधिलकी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक वाढदिवसाच्या उपक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना अल्पोपहार देवून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या वेळी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून भेटवस्तू दिल्या. यातून त्यांच्यातील शिक्षकांप्रती प्रेम भावना वृद्धिंगत होते, असे श्री स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस च्या संचालिका प्रा.सौ. चव्हाण मॅडम यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी लागणारी सर्व तयारी या विद्यार्थ्यांनी केली असल्याने त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवस्थापनाचे धडेही मिळत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.






