दादा पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराची यशस्वी सांगता

Google search engine

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील महाविद्यालय, कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने सातदिवसीय ‘विशेष श्रमसंस्कार शिबीर’ कर्जत तालुक्यातील पठारवाडी येथे संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विक्रम कांबळे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य विक्रम कांबळे म्हणाले की, गाव स्वच्छतेबरोबर मेंदूची सफाई गरजेची आहे. विद्यार्थ्यांमधून गाडगे महाराज, तुकडोजी महाराज निर्माण व्हावेत. एन.एस.एस मधून व्यक्तिमत्व घडते. विद्यार्थ्यांनी वसा आणि वारसा जपा. अंधश्रद्धा टाळून विज्ञानवादी बनले पाहिजे. समाज व्यवस्थेतील प्रश्नांची जाणीव झाली पाहिजे. मानवतेचा दृष्टिकोन बाळगा. माणसाचे जीवन बदलण्याचे सामर्थ्य थोरांच्या विचारात आहे. एन.एस.एस मधून घेतलेले गुण कायम जोपासा असे आवाहन यावेळी व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, लोकसहभागातून गावाचा विकास होतो आहे. जे ज्ञान तुम्ही आत्मसात केले आहे ते जपा. गावाचा रचनात्मक विकास हवा. शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रबांधणीसाठी मदत होते. ही एक लोक सहभागातून चाललेली चळवळ आहे. श्रमाचे मोल पैशात व्यक्त करता येत नाही. शिबिरातून घेतलेले संस्कार जपून ठेवा असा सल्ला दिला.

सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर काळात सीसीटी बंधारे बांधणे, रस्ता दुरुस्ती, गाव स्वच्छता, वृक्षारोपण, नाला खोलीकरण, प्रबोधनपर दिंडी, पथनाट्य यासारख्या या उपक्रमांचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. सात जानेवारी रोजी अनिल तोरडमल यांनी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे, प्लास्टिकचा वापर टाळा. नामशेष होत चाललेल्या प्रजातींचे संरक्षण केले पाहिजे असे मत व्यक्त केले. आठ जानेवारी रोजी नवनाथ अडसूळ यांनी ‘शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र व युवक’ याविषयी बोलताना महाराजांची युद्धनीती, व्यवस्थापन, महिलांविषयी, शेती विषयक या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मत व्यक्त केले. नऊ जानेवारी रोजी उज्ज्वला कवळे यांनी पोस्को कायद्यांतर्गत होणारे गुन्हे याविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. दहा जानेवारी रोजी हनुमंत वाघमोडे यांनी ‘करिअर मार्गदर्शन’ करताना बँकिंग क्षेत्रात असणाऱ्या संधी, अभ्यास नियोजन, मनाची एकाग्रता याविषयी मार्गदर्शन केले. अकरा जानेवारी रोजी रवींद्र साळुंखे यांनी ‘डिजिटल इंडिया’ याविषयी बोलताना सध्याच्या काळात होणारे सायबर गुन्हे, त्याचे स्वरूप व्याप्ती व त्यावर काय उपाययोजना करता येतील याविषयी सविस्तर माहिती दिली.

समारोपीय समारंभात सुमित साळवे व दीक्षा गोळे यांनी शिबिरात आलेले अनुभव कथन केले. ग्रामस्थ मोहन शिंदे व बाळासाहेब महाराज यांनीही एन.एस.एस. विभागातील विद्यार्थ्यांचे आणि उपक्रमांचे कौतुक केले. संपूर्ण सात दिवस ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना सकाळी नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत लोकसहभागातून अन्नदान केले. या कार्यक्रमासाठी सरपंच शरद यादव, माजी सरपंच विजू काका तोरडमल, सागर लाळगे मोठा पठाडे, शेखर पठाडे , सतीश पठाडे, सुरेश पठाडे, दादा पठाडे यशवंत पठारे, जालिंदर चौधरी, प्रमोद पठाडे, श्रीकांत पठाडे, दत्ता गोडसे, दत्ता पठाडे, हरी चौधरी, अमर शिंदे, अतुल कदम, शिवाजी पठाडे, उपसरपंच गहिनीनाथ पठाडे, बाबूराव तोरडमल, नितीन तोरडमल, मोहन शिंदे, अशोक मराळ, भास्कर चौधरी, शशिकांत बोंगाणे इत्यादी ग्रामस्थ, उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव व बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.

समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी पाटोळे व कृष्णा शेटे यांनी केले. तर वर्षा पावणे हिने आभार मानले.

प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास रोडगे, डॉ. वाल्मीक कापसे, प्रा. बलभीम महारनवर, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. आशा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.