अळसुंदे हायस्कूलमध्ये रझा पेंटिंग ज्ञानरचनावादी कार्यशाळा

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये थोर भारतीय चित्रकार सईद हैदर रझा यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणाऱ्या इयत्ता नववीच्या वर्गातील इंग्रजी विषयाच्या पाठाचे ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन अध्यापन करण्यासाठी पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री सईद हैदर रझा यांच्या जगप्रसिद्ध अमूर्त चित्र पाहून विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वतः काढलेल्या अमूर्त चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक सुनील गोरखे यांनी विद्यार्थ्यांना सईद हैदर रझा यांच्या अमूर्त चित्रकले विषयी माहिती सांगताना त्यांच्या चित्रात वापरत असलेले भौमितिक आकार ज्यामध्ये वर्तुळ,त्रिकोण, चौकोन,आयत, रेषा आणि बिंदू इत्यादी च्या मदतीने केलेल्या जगप्रसिद्ध पेंटिंग विषयी माहिती दिली.

इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी रझा साहेब यांनी काढलेली चित्रे पाहून स्वतः शाळेत अखीव आणि रेखीव चित्रे काढली आणि आकर्षक रंगात रंगविली.

सदर चित्रांचे प्रदर्शन विद्यालयात भरविण्यात आले आणि परीक्षक म्हणून मोहन बनसुडे, रवींद्र विधाते आणि प्रवीण कांबळे यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

या आकर्षक चित्रांच्या प्रदर्शनास विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शालेय परिसरातील पालकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला. सदर चित्राच्या परीक्षणानंतर खालील प्रमाणे अनुक्रमे तनुजा जाकिर तांबोळी, दीक्षा पांडुरंग पवार, तन्मय विठ्ठल वाघमारे, अरमान शफिक तांबोळी, ऋषिकेश नाना लोंढे, दत्तात्रय अण्णा दिंडोरे यांनी अनुक्रमे विभागून प्रत्येकी तीन क्रमांक मिळवले तर मानसी सुधीर गार्डी व गौरी संतोष गाडे या विद्यार्थिनी उत्तेजनार्थ पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. आकर्षक प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.

केवळ खडू फळा अध्यापन पद्धती न वापरता ज्ञान रचनावादी पद्धतीने विद्यालयात चालू असलेल्या अध्यापन कार्याबद्दल अळसुंदे देमनवाडी व पंचक्रोशीतील पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी विद्यालय व्यवस्थापन व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.