दाट धुक्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल

Google search engine

 

यंदा खरीप हंगामात पावसाने सतावले तर रब्बी हंगामातील पिकाच्या बाबतीत धुक्याने रडवले, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. वातावरणातील बदलाने कांदा पिकावर करपा रोगासह मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने तीस टक्के उत्पन्नही शेतकऱ्यांच्या पदरात पडते की नाही ? अशी भयानक स्थिती उद्‌भवली आहे.

चालू वर्षी खरीप पिकांच्या बाबतीत कमी झालेला पाऊस व त्यातच अवकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा सगळ्या रब्बी हंगामातील पिकावर केंद्रित झाल्या होत्या. विहिरींमध्ये पाणी होते. या शिवाय कांद्यास चांगला बाजारभाव असल्याने साहजीकच सर्वच शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे मोर्चा वळवला होता. सुरुवातीच्या काळात चांगले वातावरण राहिल्याने पिकाची वाढ जोमदार झाली. मात्र, गेली काही दिवसांपासून वातावरणात झपाट्याने बदल होऊन सुरुवातीला दाट धुक्याचा मारा व त्यानंतर सततच्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर विपरीत परिणाम झाला आहे.

 

ढगाळ हवामानामुळे पिकाची वाढ खुंटली

पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, कांद्याची पात पिवळी पडली आहे, पिकाचे शेंडे जळाल्याप्रमाणे झाले आहे. या निसर्गाच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला असून रब्बी हंगामाच्या पिकाच्या बाबतीत उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सकाळी पडणारे दाट धुके व ढगाळ हवामानामुळे पिकाची वाढ खुंटली असून पाने पिवळी पडून करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांची स्थिती चांगली होती मात्र आता तीस टक्केही उत्पादन मिळते की नाही अशी शंका आहे. पूर्वी अशी स्थिती उद्‌भवली की, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन होत नसल्याने पर्यायाने शेतकऱ्यांना खते-औषधे विकणाऱ्या दुकानदारांच्या सल्यानुसार पिकावर औषधे मारण्याशिवाय पर्याय राहत नाही.