
बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला यशस्वीरित्या संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, प्रा.भागवत यादव व डॉ प्रमोद परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये बहि:शाल शिक्षण मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या बॅरिस्टर डॉ. जयकर व्याख्यानमाला म्हणजे पाठ्यपुस्तके, इतर विविध विषय समजावून घेण्याचे एक चांगले व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर घारगाव श्रीगोंदा येथील श्री. प्रशांत जालिंदर खामकर यांनी गुंफले. आजच्या युवकांसाठी स्वयंशिस्त काय आहे, स्वतःमध्ये बदल कसा घडून आणला पाहिजे, वेळेचे नियोजन कसे केले पाहिजे, तसेच व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी व्यायाम, वाचन, संतुलित आहार, चालू घडामोडीचे ज्ञान इत्यादीद्वारे सर्वांगीण विकास कसा होतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ‘हसण्यासाठी बालेवाडी पुणे येथील आकाशवाणी केंद्र पुणे येथील कार्यक्रमाधिकारी बाबासाहेब रघुजी खराडे यांनी गुंफले. याप्रसंगी त्यांनी विविध काव्यपंक्तीतून, हास्य विनोदातून जीवनाला विद्यार्थ्यांनी कसा आकार द्यावा, शिकून विकास कसा होतो तसेच नेहमी प्रसन्न व आनंदी हसतमुखाने काम केले तर ते कसे लवकर संपते आणि यश मिळते यावर भाष्य केले.
व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ‘संत हे चालते बोलते विद्यापीठ’ या विषयावर पिंपळगावपिसा श्रीगोंदा येथील श्री संभाजी कोंडीबा दराडे यांनी गुंफले. याप्रसंगी दराडे यांनी संतांचे विचार, शिकवण आणि आचरण ही समाजासाठी मार्गदर्शक आणि दिशा देणारे असल्याचे सांगितले. संत हे केवळ धार्मिक गुरु नसून समाजात चांगले विचार आणि संस्कार मूल्य रुजवण्याचे काम करतात. संतांचे जीवन म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा आहे. त्यांच्या शिकवणीतून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी.
व्याख्यानमालेतील व्याख्यान सत्राचे प्रास्ताविक केंद्र कार्यवाहक डॉ. आशा कदम, डॉ. दादासाहेब वडावकर, प्रा. विठ्ठल आसवले यांनी केले तर डॉ. विकास भोसले, प्रा. स्वप्निल मस्के, प्रा.नेहा बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे डॉ. प्रतिमा पवार व प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. या व्याख्यानमालेसाठी प्राध्यापक वर्ग व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.






