
गुरूवार, दिनांक १९ डिसेंबर, २०२४
मा. सभापती : राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडला आहे. त्यावर सभागृह नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, माझे स्नेही माननीय अंबादास दानवे, माननीय मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे त्याचप्रमाणे दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांतजी शिंदे, ॲड. अनिलजी परब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि माझी विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे सर्वप्रथम मन:पूर्वक आभार मानतो.
भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी, देशाचे कणखर गृहमंत्री माननीय श्री. अमितभाई शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. जे.पी.नड्डाजी, प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभेच्छा आणि आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माननीय उप मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि माननीय श्री. अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन प्राप्त करीत तसेच आपणा सर्वांच्या सदिच्छा सोबत घेत मी विधानपरिषद सभापतीपदाचा कार्यभार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून नम्रपणे स्वीकारीत आहे. या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदी आपण माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी सर्व पक्षांच्या सन्माननीय गट नेत्यांचे आणि सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांचा ऋणी आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या सभागृहाचे सभापती म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला ते -माननीय श्री. वि. स. पागे,माननीय श्री. रा. सू. गवई, माननीय श्री. जयंतराव टिळक, माननीय प्राध्यापक ना. स. फरांदे सर,
माननीय श्री. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या सभागृहाचे विद्यमान सदस्य आणि माजी सभापती माननीय श्री. रामराजे नाईक-निंबाळकर तसेच उप सभापती महोदया माननीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांचे मार्गदर्शन आणि स्नेह यापुढेही मला लाभणार आहे याबद्दल आनंद व्यक्त करतो.
आपली महाराष्ट्राची भूमी शूरवीरांच्या पराक्रमाने आणि साधू-संतांच्या शिकवणूकीने पावन झालेली आहे. त्या सर्वांच्या पवित्रस्मृतीस मी नतमस्तक होत वंदन करतो.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणादायी स्मृतीस मी नतमस्तक होत अभिवादन करतो. आज माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतील या महत्त्वपूर्ण प्रसंगी मी आमचे दिवंगत नेते आदरणीय श्री. गोपीनाथजी मुंडे त्याचप्रमाणे मला समाजकारणात आणणारे आदरणीय श्री. अण्णा डांगे यांचे कृतज्ञ स्मरण करतो.
मी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी गावचा सरपंच म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा सन २००० साली श्रीगणेशा केला. आज बरोबर २४ वर्षांनी, आमच्या पक्षसंघटनेने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर, संसदीय लोकशाहीतील या उच्चासनावर आसनस्थ होताना माझ्या मनात संमिश्र भावना दाटून येत आहेत. विधिमंडळाला लोकशाहीच्या मंदिराची उपमा देणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब भारदे आणि हे उच्चासन समर्थपणे सांभाळणारे “ज्येष्ठांच्या सभागृहातील सरस्वतीपुत्र” माजी विधानपरिषद सभापती माननीय प्राध्यापक ना. स. फरांदे सर यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मी एक कार्यकर्ता आज या पदापर्यंत पोहोचलो हे मी माझे भाग्य समजतो आणि सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सध्याचे वर्ष अनेक ऐतिहासिक घटनांच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. अशा या कालावधीत आपण या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देणार आहोत ही आनंदाची बाब आहे. त्यादृष्टीने मी आणि आपण सर्वच स्वत:ला भाग्यशाली समजूया. हे ऐतिहासिक घटनांचे महत्त्वपूर्ण संदर्भ म्हणजे –
१) जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारताची राज्यघटना देखील विश्वस्तरावर एक उल्लेखनीय आणि गौरवास्पद ठरलेली अशी राज्यघटना आहे. आपली ही राज्यघटना आपण स्वीकारल्याच्या ऐतिहासिक पर्वाचा अमृतमहोत्सव आपण साजरा करीत आहोत. ब्रिटीशांच्या जोखडातून भारताबरोबरच १९४७ च्या सुमारास अनेक देश स्वतंत्र झाले परंतु तेथे भारताप्रमाणे संसदीय लोकशाही व्यवस्था म्हणावी तशी मूळ धरू शकली नाही. याउलट भारताचे संसदीय लोकशाहीचे उदाहरण वैश्विकस्तरावर गौरवाने दिले जाते. हे केवळ आणि केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या राज्यघटनेमुळेच शक्य झाले आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतो की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे १९२६ ते १९३७ या काळात मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे म्हणजे आताच्या विधानपरिषदेचे सदस्य होते आणि त्यानंतर १९३७ मध्ये ते विधानसभा सभागृहाचे सदस्य झाले.
२) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान केवळ महाराष्ट्र पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे असे आहे. आक्रमकांनी तोडफोड केलेली मंदिरे, पवित्र तीर्थस्थाने यांचा जीर्णोध्दार त्यांनी केला. घाट, धर्मशाळा उभारल्या, एक न्यायप्रिय आणि कर्तबगार शासक म्हणून त्यांचे सदैव आदराचे स्थान आपल्या मनामध्ये आहे. सैन्यामध्ये महिलांच्या तुकडीची निर्मिती, शेतकऱ्यांना करमाफी आणि तलाव, विहिरींच्या माध्यमातून सिंचन सुविधा, गोपालनाचा पुरस्कार, दुर्मीळ ग्रंथांची हस्तलिखिते तयार करून त्यांचे जतन, विद्याप्रसार आणि ज्ञानदान याचा पुरस्कार, संस्कृत पाठशाळा, गोरगरीबांसाठी अन्नछत्र यांची उभारणी, सतीप्रथेला विरोध असा या कर्तबगार महिला शासकाच्या कार्यकर्तृत्वाचा आयाम फार मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवरायांचा कल्याणकारी राज्याचा हा विचार पुढे नेला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण साजरे करीत आहोत. त्यांचे कार्य आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहिल. त्यांच्या माहेरच्या वंशातील मी एक घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
३) ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुध्द आदिवासी बंधू-भगिनींना संघटीत करून जल, जंगल आणि जमीन याच्या रक्षणार्थ लढा उभारणारे आमचे आदरस्थान जननायक बिरसा मुंडाजी यांचे १५० वे जयंती वर्ष आपण साजरे करीत आहोत.
४) भारताच्या संसदीय लोकशाहीच्या वाटचालीतील एक तेजस्वी पर्व म्हणजे माजी पंतप्रधान श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करीत आहोत. “कार्य कठिण है…इसलिए करने योग्य है…साधारण कार्य तो सभी करते है” हा भगवद्गीतेचा संदेश श्रध्देय अटलजी नेहमी सांगत. हे त्यांचे उद्गार माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना कर्तव्यपथावर अविरत मार्गक्रमण करण्याची चिरस्फुर्ती देत राहतील.
५) आमची मातृसंस्था जिने आमच्यावर “तेरा वैभव अमर रहे माँ… हम दिन चार रहे या न रहे…” हा संस्कार बिंबविला, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष – १९२५ ते २०२५, आपण साजरे करीत आहोत. विशेष म्हणजे या संस्थेचे मुख्यालय असणाऱ्या नागपूर नगरीत होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात आज माझी सभापतीपदी निवड झाली आहे, हा क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरणारा आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू असते तेव्हा एकप्रकारे राज्यातील जनतेचे भाग्यचक्रच गतीमान होत असते. जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण आपण उपयोगात आणायचा आहे. सत्ताधारी आणि विरोधी ही संसदीय लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत आणि त्या रथात जनताजनार्दनाची अभिव्यक्ती विराजमान आहे. या रथाचा मार्ग विकासाच्याच दिशेने आहे, असे चित्र आपल्याला दिसले पाहिजे. सन्माननीय सदस्यांचा सभागृह कामकाजातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. या संदर्भातील मूर्तीमंत उदाहरण याच सभागृहात आपणा समोर विराजमान आहे. सन २०१४ साली माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली, त्यावेळी ते स्वत: म्हणाले होते की, “माझी सभागृहातील कामगिरीच मला मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन आली…” यापुढे त्यांनी जे सांगितले होते ते तत्व आपण सर्वांनी प्रत्यक्षात आणले तर या वरिष्ठ सभागृहातील चर्चा अधिक फलदायी आणि लोकहितकारी होईल असा मला विश्वास वाटतो. ते पुढे म्हणाले होते – “सन्माननीय सदस्यांनी सभागृहात असताना समाजाचा विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि समाजात असताना सभागृहाचा विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे…” याचा अर्थ सभागृहात आपली कायम उपस्थिती ठेवावी आणि सभागृहात बसलेले असताना समाजाचा कुठला प्रश्न नेमक्या आयुधामार्फत मांडून आपण जनतेला न्याय देऊ शकू यादृष्टीने सतत तयारी केली पाहिजे. त्याचप्रमाणे समाजात वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी आपण वावरत असताना अनेक लोकं आपल्याला भेटत असतात, अर्ज-निवेदने देत असतात… त्यावेळी जनतेचे हे प्रश्न सभागृहात मी कशा पध्दतीने मांडू शकेन, त्याला न्याय मिळवून देऊ शकेल याचा विचार आपण केला पाहिजे. आपले सभागृह ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते मात्र अलिकडच्या काळात तरूण सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ते वयोमानपरत्वे तरूण होत चालले आहे!
आपणां सर्वांना विदित आहेच की, विधानपरिषद हे व्दितीय सभागृह देशात महाराष्ट्रासह फक्त ६ राज्यांमध्ये आहे. अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे आपले हे सभागृह, मुंबईतील टाऊन हॉलच्या दरबार हॉल येथील मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलच्या, दिनांक २२ जानेवारी, १८६२ च्या प्रथम बैठकीपासून, आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. सन १९२१ मध्ये श्री. नारायण चंदावरकर यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. अत: सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड आपण मानला आणि त्यानुषंगाने संदर्भसमृध्द ग्रंथसंपदा प्रकाशित करण्याचा उपक्रम उप सभापती महोदया डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांच्या पुढाकाराने हाती घेतला आहे. ग्रंथनिर्मितीची ही कार्यवाही आपल्याला वेगाने पुढे न्यायची आहे.
विधानमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी होण्याच्यादृष्टीने आपणा सर्वांच्या सहकार्याने मी चतुसूत्री – फोर पॉईंट प्रोग्राम अंमलात आणणार आहे.
१) प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्त्व आहे. अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून खूप मोठी यंत्रणा प्रश्नोत्तराच्या तासासाठी आणि एकंदरीतच अधिवेशनासाठी कार्यरत असते. प्रश्नोत्तराचा तास विना व्यत्यय पार पाडला जावा आणि रोजच्या तासाभरात किमान १० प्रश्न तरी पुकारले जाऊन चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे. माननीय लोकसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत यासंदर्भात विचारमंथन झालेले आहे. संसदीय लोकशाही व्यवस्था जनतेप्रती अधिकाधिक उत्तरदायी व्हावी असे वाटत असेल तर आपण सर्वांनी प्रश्नोत्तराचा तास आणि त्याचे गांभीर्य ओळखायला हवे.
२) समिती पध्दती हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे. वर्षभरात ३ अधिवेशनांचे ३ महिने झाले की ऊर्वरित काळात काय कामकाज होते, विधानमंडळाचे सरकारवर खरंच नियंत्रण असते किंवा कसे अशा जनमानसातील चर्चा आपल्या संसदीय लोकशाहीविषयी अकारण नकारात्मक भाव निर्माण करीत असतात. वस्तूत: दोन अधिवेशनांच्या मधील कालावधीत सुरू असलेली समिती कामकाज पध्दत हे यासंदर्भातील चर्चांना योग्य उत्तर आहे. समित्यांचे गठन, समिती प्रमुखांना उचित मार्गदर्शन, सभागृहाला अहवाल सादर होणे ही कार्यपध्दती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल.
३) कायदा निर्मिती हे विधानमंडळाचे अंगीभूत महत्त्वाचे कार्य आहे. देशपातळीवर अनुकरणीय ठरलेले कायदे हे आपल्या विधानमंडळाचे वैशिष्ट्य आहे. कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत सन्माननीय सदस्यांचा सक्रीय सहभाग असावा तसेच महत्त्वाचे विधेयक विना चर्चा संमत होऊ नये यादृष्टीने कार्यवाही करूया.
४) राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे “कल्याणकारीराज्य संकल्पनेची” प्रभावी अभिव्यक्ती होय. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यांवरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे, सन्माननीय सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे यादृष्टीने आपण उत्तम कार्य करू या.
Quality Debate and Diverced Views will be acknowledged… Debate and discussion are the life and blood of Parliamentary Democracy… So let us debate, discuss and decide but do not disturb… गोंधळात सभागृह कामकाजाचा बहुमोल वेळ वाया जाणार नाही याची दक्षता आपण घेऊ या… आदरणीय बाळासाहेब भारदे हे संसदीय लोकशाही पध्दतीचे प्रभावी भाष्यकार म्हणून देखील ओळखले जात. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर – “लोकांची भलाई हीच आपली कमाई अशी भावना उभय पक्षी असेल तर काही सत्तारुढांची बेपर्वाई आणि काही विरोधकांची दांडगाई या गोष्टी कमी होऊन लोकशाहीची पुण्याई कृतार्थ होईल.” अशा भावनेने आपण सर्व मिळून उत्तम कार्य करूया. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल असे जबाबदारीपूर्ण वर्तन आपले राहिल अशी काळजी घेऊया. धन्यवाद. आपणा सर्वांचे पुन:श्च एकदा आभार…जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान






