
रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालयात एनसीसी व जिमखाना विभाग आयोजित ‘शॉर्ट टर्म कोर्स’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. ‘सशक्त युवक सशक्त भारत’ या विषयावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समुपदेशक डॉ. राजमोहन काळे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. राजमोहन काळे यांनी कार्यशाळेमध्ये सांगितले की, तरुण पिढीची एकाग्रता गोल्ड फिश या कमी एकाग्रता असलेल्या माशापेक्षाही कमी व्हायला लागली आहे. विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात करिअर करायचे ठरवले आहे त्यावर फोकस ठेवायला हवा. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, लता मंगेशकर, झाकीर हुसेन, विश्वनाथ आनंद, जावेद अख्तर, बिल गेट्स या सर्वांनी खडतर परिस्थितीचा सामना करून आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये झोकून देऊन कार्य केले, त्यामुळेच ते यशस्वी ठरले असल्याचे सांगितले. वाईट व चांगले असे दोन अविष्कार असतात. वाईट गोष्टीला नेहमी आकर्षण असते, चांगल्या गोष्टीला आकर्षण नसते. याकरिता त्यांनी दूध व दारू यांचा दाखला दिला. तरुण पिढीने एज्युकेशन, एक्झामिनेशन, एक्सपिरीयन्स, इथिक्स या चार ‘ई’ काराला महत्त्व दिले पाहिजे. संगत ही वाईट गोष्टी करायला भाग पाडत असते, त्यामुळे संगतीदार बदलावा. नकारात्मकतेला आकर्षण जास्त आहे. पावर ऑफ स्पोकन वर्ल्ड, चाणक्यनीती आदि पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपला मार्गदर्शक गुरु हा शिक्षक आणि आई-वडील असतात, त्यामुळे त्यांच्या सल्यानुसार मार्गक्रमण करा असे आवाहन त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना केले.
या कार्यशाळेचे आयोजन शॉर्ट टर्म कोर्सचे समन्वयक प्रा. सुभाष कोरडे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. सुनील देशमुख, किमान कौशल्य विभागप्रमुख प्रा. राजेश दळवी, कला विभागप्रमुख प्रा.भिमराव गवारे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. वसंत आरडे, समन्वयक प्रा. किरण भोसले, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.पवन कडू, एनसीसी विभागप्रमुख मेजर डॉ. संजय चौधरी यांनी केले होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनील देशमुख यांनी, प्रा. किरण भोसले व प्रा. मीना खेतमाळीस यांनी सूत्रसंचालन तर प्रा. राजेश दळवी यांनी आभार मानले







