

समाज प्रबोधन संस्थेच्या समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कर्जत येथील इयत्ता बारावी पर्यंत विद्यालयात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत असे यश मिळवले. प्रतीक सुरेश तोरडमल यांची पोलीस उपनिरीक्षक पदी, आनंद भाऊसाहेब खुळे यांची राज्य राखीव पोलीस दल, अमीर ताजुलमुल्क आतार यांची राज्य राखीव पोलीस दल व आदित्य प्रकाश गिरी यांची महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा समर्थ विद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. नामदेवराव राऊत, संस्थेच्या निरीक्षिका सौ. उषा अक्षय राऊत, सचिव श्री. वैभव शेठ छाजेड , प्रमुख पाहुणे श्री.सतीश व्यवहारे साहेब, उद्योजक श्री.विजय नेटके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले प्रतीक सुरेश तोरडमल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितले की, कुठलीही स्पर्धा परीक्षा अवघड नसते. आपल्याला त्याची मनापासून तयारी करावी लागते. आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर जिद्द,कष्ट व सातत्य खूप गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भविष्यात स्पर्धा परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. जो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करेल त्याला यश नक्की मिळते. मी सुद्धा शेवटच्या क्षणी १२ ते १३ तास अभ्यास केला. त्याचे फळ आज मला मिळाले आहे. राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेला आनंद भाऊसाहेब खुळे यांनी सांगितले की मिलिटरी मध्ये भरती होण्याचे माझे स्वप्न होते, ते मी आता पूर्ण केले आहे. याचा मला खूप आनंद होतोय. एवढ्यावरच न थांबता मी अजूनही पुढील स्पर्धा परीक्षा देणार आहे. मी सामान्य कुटुंबातला मुलगा जरी असलो तरी जिद्द, चिकाटी व व्यायामाच्या जोरावरती मी हे यश मिळविले आहे. या यशामध्ये पाचवी ते बारावी मध्ये मी समर्थ विद्यालय येथे शिकत असताना, मला जी अभ्यासाची गोडी निर्माण झाली व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मी आज हे यश मिळू शकलो. त्याबद्दल संस्थेचे व शाळेचे मनापासून आभार मानतो. आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फक्त मेडिकल व इंजिनिअरिंग एवढाच विचार न करता करिअरच्या अनेक वाटा तुमच्यासमोर आहेत त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. प्रामाणिक कष्ट केले तर आपण सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकतो फक्त आपला शाळेवर व शिक्षकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेवराव राऊत यांनी समर्थ विद्यालयात सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते त्यामुळे विद्यालयाचे अनेक विद्यार्थी आत्तापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये शिक्षकांचा व त्यांच्या पालकांचा खूप मोठा वाटा आहे. भविष्यातही स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना घडविण्यात समर्थ विद्यालय अग्रेसर राहील असा विश्वास व्यक्त केला .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करत येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागावे असेही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य श्री. चंद्रकांत राऊत यांनी विद्यालयाच्या आजपर्यंतच्या स्पर्धा परीक्षेतील कारकिर्दीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल भापकर व आभार प्राध्यापक नवनाथ गुंजाळ यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







