सौ.जान्हवी रवींद्र शेवाळे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

Google search engine

 

तालुक्यातील पाटेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.जान्हवी रवींद्र शेवाळे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने देण्यात आला. पाटेगाव ग्रामपंचायत मध्ये सरपंच जान्हवी शेवाळे यांनी सरपंच म्हणून आदर्श कामे केली आहेत. त्यामध्ये स्वच्छता अभियानामध्ये शोषखड्डे, महिलांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे, यासाठी त्यांनी प्रत्येक कुटुंबीयांना डस्टबिन देऊन संक्रांतीचे अनोखी भेट दिली. यामुळे रस्त्यावर येणारा कचरा घरामध्ये साठवला गेला. आणि नंतर त्याचे संकलन करण्याचे काम झाले. यामुळे गाव स्वच्छ आणि सुंदर झाले. पर्यावरण राखण्यासाठी चांगले काम शेवाळे यांनी केले. याशिवाय गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी पाटेवाडी तलावामधून एक कोटी ८७ लाख रुपये किमतीची जलजीवन योजना गावांमध्ये राबवली. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे. म्हणून तसेच सिंचन क्षेत्र वाढीसाठी जलयुक्त शिवार योजनेमधून परिसरातील नदीतील

गाळ काढला, त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आणि शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्रामध्ये देखील यामुळे वाढ झाली. याशिवाय परिसरामध्ये चार पाजर तलाव व ३०० नाला बंडिंग १७ दगडी व काँक्रीटचे नदीवरील बंधारे निर्माण केले. संपूर्ण गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण व गावामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचे काम केले. याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे असणाऱ्या गावांमधील ग्रामपंचायत कार्यालय व सेवा संस्थेच्या इमारतीचे बांधकाम पुढाकार घेऊन पूर्ण केले. ही सर्व विकासकामे विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे व ज्येष्ठ नेते एडवोकेट कैलास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने पूर्ण करण्यात आली. सर्व विकास कामांची दखल घेत त्यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार माऊली संकुल, अहिल्यानगर येथे देण्यात आला. यावेळी एकनाथ ढाकणे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे पाटील, प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, अँड. कैलास शेवाळे आदी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ग्रामसेवक केसकर भाऊसाहेब , उपसरपंच दादा पाटील सर , नामदेव लाड, विजय मोरे , मनीषा ताई कदम , कुंदाताई चौघुले या सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

 

आजचा हा सन्मान पाटेगावच्या प्रत्येक घरातील नागरिकाचा आहे .आणि असाच सर्वांचा पाठिंबा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावा .मी जरी पदावर नसले तरी महिलांसाठी , समाजासाठी , विद्यार्थ्यांसाठी , मुलींसाठी काम करण्याची व तळागाळातील लोकांसाठी काम करण्यासाठी मी सदैव तत्पर असेल .आणि मी पुन्हा एकदा सांगेल की , माझ्या या यशाच्या मागे सर्वांचा हात आहे.कारण एकटा माणूस काहीच करू शकत नाही त्यासाठी सर्वांची हाक, साद,आणि साथ असावी लागते.

सौ.जान्हवी रवींद्र शेवाळे