
कर्जत तालुक्यातील घुमरी येथील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते कैलास अनभुले यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून हा आमदार राम शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ अधिकच वाढले आहे.
‘आमदार राम शिंदे हे मतदारसंघात जातीपातीचे राजकारण करत असल्याची टीका यावेळी कैलास अनभुले यांनी केली. आमदार रोहित पवार यांच्याकडे मतदारसंघाच्या विकासासाठी व्हिजन असून त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत विजयाची तुतारी फुंकण्याचा निर्धार व्यक्त करत, आमदार रोहित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची प्रतिज्ञा केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी कैलास अनभुले आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचं उत्साहपूर्ण स्वागत करत त्यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







