
पिंपळवाडी गावात जलजीवन योजनेचे काम चालू असताना खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून डबक्यात मच्छर व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथे जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी असल्याने लहान मुलांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून या डासांमुळे मुले आजारी पडत असून संबंधित कॉन्ट्रॅक्टर ने हा खड्डा तत्काळ बुजवण्याची मागणी ऍड .सुरेश पोटरे व पिंटू पाटील यांनी केले आहे .
तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असून नियमित औषध फवारणीअभावी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, विविध साथींचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औषध फवारणी करण्याची मागणी केली जात आहे. पिंपळवाडी परिसरात गेले अनेक दिवस सतत पाऊस पडत आहे. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने व तसेच कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीने शाळेशेजारी मोठे डबके तयार झाले आहे . या पाण्यामध्ये डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे लहान मुले व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये तसेच परिसरातील मोकळ्या जागेत वाढणार्या गवतावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायत च्या संबंधित विभागाकडे केली आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. थंडी, ताप, सर्दी, घसा दुखणे, कणकणी असे आजार असलेले रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. जलजीवन योजनेवेळी खोदलेल्या खड्ड्यांमुळे परिसरात पावसाच्या पाण्याचे मोठे डबके साचलेले आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्णदेखील वाढत आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्याचे डबके तात्काळ बुजवावे .
या खड्ड्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या हा खड्डा सर्वांना त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे संबंधीत कॉन्ट्रॅक्टर ने त्वरित खड्डा बुजवावा .
पिंटू पाटील , माजी सरपंच पिंपळवाडी






