‘स्पर्धा परीक्षेतील संधी’ यावर संदीप घालमे यांचे व्याख्यान 

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षेतील संधी व राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, सहाय्यक संचालक राहुल घालमे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाची उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. संदीप गोंदके, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना राहुल घालमे यांनी सांगितले की, ज्या परीक्षेची तयारी करायची आहे त्याची सर्व माहिती असावी. अभ्यासक्रमाचे घटक लक्षात घेऊनच संदर्भ ग्रंथ अभ्यासावेत. अगोदर झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. विषयाचे परिपूर्ण ज्ञान घेऊन लॉजिक ने अभ्यास करावा असे त्यांनी नमूद केले.

यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या सुदाम देवकर, तनुजा देवकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी सांगितले की, दादा पाटील महाविद्यालय स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य आहे. या महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थी शासकीय पदावर पोहोचावेत अशा सदिच्छा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. संदीप गोंदके, सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के व आभार प्रा. राम काळे यांनी मानले.