
कर्मवीर सप्ताहनिमित्त दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे. ‘संस्कार आणि आजची पिढी’ या विषयावरील व्याख्यानरुपी पहिले पुष्प गणेश शिंदे यांनी गुंफले.
या कार्यक्रमासाठी अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, प्रा. प्रकाश धांडे, अनिल तोरडमल, प्रा.भास्कर मोरे, प्रा. श्रीकांत शिंदे, देविदास तोरडमल, विलास निंबाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर आदी मान्यवर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
‘संस्कार आणि आजची पिढी’ या विषयावर बोलताना गणेश शिंदे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना योग्य वेळी जाणीव करून दिली तर परिस्थिती बदलू शकते. सर्वांमध्ये ऊर्जा आहे, मात्र प्रत्येकांमधली ऊर्जा वेगळी आहे. आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हा प्रभावी मार्ग आहे. विद्यार्थी जीवन हे भरारी घेण्याचे वय असते शिवाय बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदलले पाहिजे. गांभीर्याने शिक्षणाकडे पहा. वडिलांच्या डोळ्यांची भाषा समजून घेऊन वागा. स्वतःची ओळख निर्माण करा. उद्योग व्यवसायाची स्वप्न बघा. मार्कांच्या बेरजेपेक्षा वेगळा विचार करा. संगत चांगली ठेवा, संगत तुमचे भविष्य ठरवते. सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करून स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा. गुणपत्रिकेत आलेले मार्क म्हणजे गुणवत्ता असा विद्यार्थ्यांना त्यांनी संदेश दिला.
याप्रसंगी सौ. सुनंदाताई पवार यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना अण्णांचे शिक्षणाकरिताचे महाराष्ट्रासाठीचे योगदान महान असल्याचे सांगितले. संधीचे सोने करून स्वतःचा यशस्वी बायोडाटा तयार करा. ध्येय निश्चित करा, अहंकार बाळगू नका. कायम शिकत राहा असा सल्ला त्यांनी दिला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास पिसाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये हा कर्मवीर सप्ताह म्हणजे आण्णांचे ऋण फेडायचा सप्ताह आहे. फळाची अपेक्षा असावी मात्र त्याकरिता ध्येय निश्चय केले तरच यश मिळेल असा संदेश दिला
महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सांगता समारंभानिमित्त बलूनचे अनावरण रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, महाविद्यालयाचे डॉ. संजय नगरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे व प्रा.स्वप्निल म्हस्के यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा.सुखदेव कोल्हे यांनी मानले






