मोबाईलच्या आहारी जाऊ नका. स्वतःची सुप्त गुण ओळखून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा : डॉ. प्रभाकर देसाई 

0
223
Google search engine

दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय व सौ. सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘कर्मवीर जयंती सप्ताह व कर्मवीर व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

 

मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंती सप्ताह व राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयात ‘आयडियाचा आविष्कार, प्राध्यापक प्रबोधिनी व रेड रिबन क्लब’ चा उदघाटन सोहळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

यानिमित्त ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: अध्ययन, संशोधन व अध्यापनाचे नवे क्षितिज’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई यांचे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.

 

प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर देसाई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आवडत्या विषयात करिअर निवडण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, आपल्यातील गुण ओळखावेत. लोकांबरोबरचा संवाद वाढविला तर त्यांच्या खऱ्या ज्ञानात भर पडेल. व्हाट्सअप विद्यापीठाचे ज्ञान अंतिम नसते. मोबाईल आजच्या पिढीचे व्यसन बनला आहे मोबाईलचा योग्य उपयोग करा, मोबाईल वापरून नवनिर्माणकर्ते बना. मोबाईलच्या आहारी जाऊ नका. स्वतःची सुप्त गुण ओळखून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. आयडियाची कल्पना प्रत्येक व्यक्तीत असते. दादा पाटील महाविद्यालय हे महत्त्वाचे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे यावे यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन. डॉ. प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले

 

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, संशोधन ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. थांबला तो संपला, त्यामुळे अविरत नवनवीन गोष्टी शिकत राहा, संशोधन करत राहा. महाविद्यालयाने आयडियाच्या आविष्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न पडायला लावणारे शिक्षक हे खरे शिक्षक असतात असे सांगितले.

 

प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक डॉ. दिग्विजय सोनवणे, आयडियाच्या अविष्कार संयोजन समितीचे समन्वयक डॉ. महेश भदाणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. वाल्मीक कापसे, डॉ. कैलास रोडगे, प्रा. बलभीम महारनवर यांनी आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिमा पवार, डॉ. आशा कदम, प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी केले. तर आभार डॉ. दिग्विजय सोनवणे यांनी मानले.