समर्थ विद्यालय, कर्जत येथे रोटरी क्लबच्या वतीने कं


समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत येथे आज रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पर्यावरण पूरक रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने समर्थ विद्यालयाच्या परिसरात कंपोस्ट खत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली त्याचे उद्घाटन रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप व रोटरी सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोटरी क्लबच्या वतीने विद्यालयाच्या ग्रंथालयास कपाट भेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, रोटेरियन रामदास काळदाते साहेब , रोटेरियन उपमन्यु शिंदे , रोटेरियन नितीन देशमुख , रोटेरियन संतोष सुरवसे, रोटेरियन पत्रकार गणेश जेवरे ,रोटेरियन प्राध्यापक सचिन धांडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंजिनियर रामदास काळदाते साहेब यांनी भूषविले. यावेळी पत्रकार गणेश जेवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात पुस्तकी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी होऊन यश मिळवावे. अभ्यासात सामान्य असलेले विद्यार्थीही पुढे जाऊन मोठे यश मिळवू शकतात त्यासाठी त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे असे सांगितले. समर्थ विद्यालय हे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणारे केंद्र असून अतिशय सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी या विद्यालयातून यशस्वी होऊन बाहेर पडले आहे, याचा आम्हाला आनंद आहे. विद्यालय परिसरात अनेक वृक्ष विद्यार्थ्यांनी लावून त्याचे जतन केले त्यामुळे विद्यालयाचा परिसर हा हवेशीर व निसर्गरम्य बनला आहे. याचे सर्व श्रेय शिक्षक व विद्यार्थ्यांना जाते असे मत त्यांनी व्यक्त केले. रोटेरियन नितीन देशमुख यांनी पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वृक्षांचे व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांनी लहान वयात समजून घेतले तर भविष्यात प्रत्येक गाव, शहर व देश वृक्षांनी नटेल व स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहील . त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावून ते जगवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत यांनी प्रास्ताविकात विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. यावेळी विद्यालयात इको क्लब व प्रहारी गटाची स्थापना करण्यात आली. समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.नामदेवराव राऊत, संस्थेच्या निरीक्षिका सौ. उषा अक्षय राऊत, सचिव श्री.वैभव छाजेड यांनी रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती पुनम वाघ व श्रीमती शारदा मेहेत्रे यांनी केले. मान्यवरांचे आभार चंद्रभामा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी यांनी मानले व सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल भापकर यांनी केले .






