
दादा पाटील महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षेविषयी बोलू काही” विषयावरील परिसंवाद रंगला .
रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ व ‘माजी विद्यार्थी संघ’ आयोजित ‘स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व स्पर्धा परिक्षेविष्यी बोलू काही या विषयावरील परिसंवाद’ याचे आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील, उद्योजक राजेंद्र तनपुरे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधीक्षक मा. विवेकानंद वाखारे, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, खजिनदार प्रा. प्रकाश धांडे, तांदळे साहेब, संतोष निंबाळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
विविध शासकीय पदांवर भरती झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शितल घालमे (पी.एस.आय), किशोर काळे (पी.एस.आय), सोनाली जगताप (पी.एस.आय), माधुरी राऊत (कॅनॉल इन्स्पेक्टर), मुक्ता देवकाते (कॅनॉल इन्स्पेक्टर), शुभांगी राऊत (तलाठी), शिवाजी चव्हाण (नगरपरिषद लेखा व लेखा परीक्षक), संदीप लोंढे (एस.आर.पी.एफ), श्रीनाथ शेंडगे (एस.आर.पी.एफ), विकास तापकीर (एस.आर.पी.एफ), स्वप्निल काळे (एस.आर.पी.एफ), गणेश भोंडवे (एस.आर.पी.एफ), योगिता मरकड (जिल्हा रुग्णालय नाशिक), ऋषिकेश भोगे (एस.आर.पी.एफ), दिनेश गाडे (एस.आर.पी.एफ), किरण बोबडे (एस.आर.पी.एफ), आनंद खुळे (एस.आर.पी.एफ), प्रवीण घालमे (एस.आर.पी.एफ) या माजी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
दादा पाटील महाविद्यालयातील विविध विषयाचे दहा विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये अतुल बाबर (अर्थशास्त्र), तेजस सरोदे, निखिल बांदल (प्राणीशास्त्र), अक्षय खाळगे, माधुरी पानसरे (रसायनशास्त्र), मनीषा उकिरडे (वनस्पतीशास्त्र), उमेश निंबाळकर, ऐश्वर्या नलवडे (गणित), अदिती अगावणे, सहदेव कानगुडे (भौतिकशास्त्र) या माजी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. फेटे परिधान केलेले सन्मानानार्थी व सूत्रसंवादक यांच्यात तीन तासांहून अधिक काळ रंगलेली चर्चा, यशस्वी विद्यार्थी व प्रमुख मान्यवर विभागीय पोलीस अधिकारी मा. विवेकानंद वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील यांनी दिलेली प्रश्नांची उत्स्फूर्त उत्तरे यातून एक हजारहून अधिक विद्यार्थ्यानी प्रेरणा घेऊन आपणही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी होण्याचा संकल्प केला.मा.विवेकानंद वाखारे यांनी कॉलेज वयात चौफेर वाचन ठेवण्याचे सांगून जे मिळवायचे आहे त्यासाठी शालेय वयापासून मनापासून तयारी करावी. ग्रामीण भागातील मुलांच्या आहारात सेंद्रिय पौष्टिकता असल्याने त्याची बुद्धी सकस असल्याचे दिसते. आपले ध्येय निश्चित करायचे असेल तर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला बनवायचे टाळा. आपण कुणापेक्षा कमी नाहीत हे सिद्ध करावे तसेच दादा पाटील महाविद्यालय ही संस्कारांची व प्रेरणेची खान असून, येथील सोयी सुविधांचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन केले.
जामखेडचे पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील यांनी सांगितले की, मी दादा पाटील महाविद्यालयामुळेच घडलो आहे. आपला बौद्धिक विकास वाढवा. येथे मिळणारे शिक्षण, आईवडिलांकडून मिळणारे संस्कार व व्यायाम या तीन गोष्टींकडे कधी डोळेझाक करु नका. उद्देश स्पष्ट असेल तर तुमचे झपाटलेपण, तुमच्याती क्षमता बाहेर काढू शकते. तरुण वयात चुका करू नका, आपल्या भविष्यातील स्वप्नांकडे लक्ष देऊन भरारी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी सूत्रसंवादक या भूमिकेतून उपस्थित मान्यवरांची व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची कहाणी उलगडून दाखवली. या चर्चेत ठाणे येथील उद्योजक राजेन्द्र तनपुरे, प्रा. प्रकाश धांडे, डॉ. संतोष भुजबळ आदींनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संयोजक प्रा. संदीप गोंदके व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश दळवी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील म्हस्के व प्रा. राम काळे यांनी केले. आभार डॉ. दिग्विजय कुंभार यांनी मानले






