डॉ. अण्णा भाऊ साठे मराठी साहित्य संमेलन,नांदगावचे उपसरपंच विजय शिंदे यांचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर 

Google search engine

 

नांदगाव (ता. कर्जत) येथील उपसरपंच विजय शिंदे यांची सामाजिक, शैक्षणिक व लोकहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळ व दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. अण्णा भाऊ साठे मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा बहुमान प्रदान केला जाणार असून, दि. ५ एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

विद्यार्थीदशेपासूनच समाजकार्याची आवड जोपासत विजय शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे नेते मा.श्री चंद्रकांतजी काळोखे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब लोंढे यांच्या साथीने तालुक्यातील विविध भागांत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. ग्रामविकास, सामाजिक सलोखा, गरजू घटकांसाठी मदतकार्य तसेच लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिक जनसेवा ही त्यांच्या कार्याची ठळक ओळख ठरली आहे. स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका, सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद—या त्रिसूत्रीवर त्यांनी काम करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे.

या कार्याची दखल घेत आयोजकांनी त्यांची समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केल्याचे नमूद केले. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विजय शिंदे म्हणाले, “हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्रामस्थांचा आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचा आहे. समाजासाठी केलेल्या कामाला मिळालेली ही पावती मला पुढील वाटचालीत अधिक जबाबदार बनवते.” पुढील काळातही सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक न्याय या मूल्यांना उजाळा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव होत असल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. विजय शिंदे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाऊसाहेब यादव जगताप मित्र परिवाराच्या वतीने तसेच नांदगावसह संपूर्ण कर्जत तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुरस्कार निवडीचे पत्र स्वीकारताना विजय शिंदे यांनी कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष तानाजी डाडर व मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी यशवंत गायकवाड, पप्पू भाऊ जगताप, दादा लोंढे, तात्या जगताप, भाऊसाहेब कुंडलिक जगताप, दीपक गायकवाड, शांताराम जगताप मेघराज जगताप , पै. विशाल जगताप, श्रीराम जगताप संजय जगताप आदी उपस्थित होते. तसेच गावातील तरुण, तडफदार युवा नेतृत्व अण्णासाहेब बागल मित्र परिवारानेही विजय शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

समाजसेवेतील सातत्य, प्रामाणिक जनप्रतिनिधित्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यांचा गौरव म्हणून मिळालेला हा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार नांदगावच्या विकासयात्रेला नवे बळ देणारा ठरेल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.