
आज पार पडलेल्या पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीनंतर कर्जत तालुक्यातील राजकीय समीकरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या आरक्षण सोडतीनंतर कर्जत तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती मा. सौ. संगीताताई उदमले यांनी कोंभळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सामान्य कुटुंबातून नेतृत्वाच्या प्रवासापर्यंत
अगदी सर्वसामान्य पार्श्वभूमीतून राजकारणात पदार्पण केलेल्या सौ. संगीता उदमले यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी थेरगाव गणातून उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचंड जनसमर्थनासह विजय मिळवला होता. त्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या कार्यशैलीची दखल घेत तालुक्यातील सर्व स्तरांवरून त्यांचे कौतुक झाले.
अडीच वर्षांनी पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाल्याने सौ. संगीता उदमले यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामांना चालना देत सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला.
आरोग्य समिती सदस्य म्हणून उल्लेखनीय योगदान
सभापतीपदाच्या काळात सौ. उदमले या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीवरही सदस्य म्हणून कार्यरत होत्या. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल अनेक स्तरांवर घेतली गेली. कोंभळी येथील रखडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि सातत्याने पाठपुरावा करून ते काम मार्गी लावले. या आरोग्य केंद्राचा लाभ आता खांडवी, कोंभळी, रमजान चिंचोली, रवळगाव, थेरगाव, भोसे, कौडाणे, मुळेवाडी, चांदे या परिसरातील नागरिकांना मिळणार आहे.
गावपातळीवरील भक्कम संघटन आणि जनसंपर्क
सध्या कोंभळी ग्रामपंचायतीत सौ. संगीता उदमले यांच्या गटाची एकहाती सत्ता असून त्यांच्या पती मारुती उदमले हे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. ग्रामपातळीवरून त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला असून, शिक्षण, आरोग्य, महिला बचतगट, पाणीपुरवठा, तसेच रस्ते विकास यासारख्या प्रश्नांवर त्यांचे सक्रीय योगदान आहे.
स्थानिक स्तरावर तळागाळातील जनतेशी असलेला त्यांचा संवाद आणि सहवास यामुळे कोंभळी गणात त्यांचा मजबूत जनाधार निर्माण झाला आहे. त्यामुळे कोंभळी पंचायत समिती गणातून त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपाशी दृढ नाते – प्रा. राम शिंदे यांना दिले मोलाचे सहकार्य
सन 2019,2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सौ. संगीता उदमले यांनी भाजपाचे उमेदवार व सध्याचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांना मोलाचे सहकार्य केले होते. त्या काळात त्यांनी भाजपाच्या विविध प्रचार उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला होता. त्यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत त्या भाजपाकडून प्रबळ दावेदार ठरण्याची शक्यता राजकीय चर्चेतून व्यक्त होत आहे.






