माहीजळगावच्या विद्युत उपकेंद्रासह प्रशासकीय इमारतीलाही मंजुरी ३ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर माहिजळगाव , नवसरवाडी, तरडगाव, निंबोडी, सीतपूर, टाकळी खंडेश्वरी व चिंचोली काळदात या गावांची विजेची समस्या कायमची दूर केल्याबद्दल आ.रोहित दादा पवार यांचे त्रिवार आभार : सामाजिक कार्यकर्ते दिपक काकडे पाटील

Google search engine

कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे नवीन विद्युत उपकेंद्र आणि कर्जत येथे महावितरण प्रशासकीय भवन उभारण्याच्या आमदार आ. रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून शासनाने या दोन्ही कामांना मंजुरी दिली. त्यासाठी एकूण ३ कोटी ४० लाख रुपये एवढा निधी मंजुर करण्यात आला आहे.

माहीजळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी अपुऱ्या विजेचा आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला होता. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे माहीजळगाव येथे नवीन विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी पाठपुरावा केला होता. नितीन राऊत यांच्या आदेशानुसार यासंदर्भात संपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करण्यात आला होता. परंतु सरकार बदलल्यानंतरही आमदार रोहित पवार यांनी हा विषय थांबू न देता मागील सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासनाने माहीजळगाव येथे ३३/११ के.व्ही. क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. या कामासाठी १ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याची वर्क ऑर्डरही निघाली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाटेगाव सबस्टेशन वर येणारा विद्युत लोड कमी होऊन नवसरवाडी, तरडगाव, निंबोडी, सीतपूर, माहिजळगाव, टाकळी खंडेश्वरी व चिंचोली काळदात आणि माहीजळगाव या गावांची विजेची समस्या कायमची दूर होणार असून शेतीला पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दीपक काकडे पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांनी आ.रोहित दादा पवार यांचे आभार मानले आहेत.

यासोबतच कर्जत येथील महावितरणच्या प्रशासकीय इमारतीसाठीही आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यालाही यश मिळाले असून शासनाने या प्रस्तावास मंजुरी देत १ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचीही वर्क ऑर्डरही निघाली असून लवकरच या इमारतीचे कामही सुरू होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या अभावामुळे होणारी अडचण दूर होऊन कामकाज अधिक सुलभ होणार आहे.

चौकट 1

माहीजळगाव , पाटेगाव , मलठण निमगाव डाकू, पाटेवाडी , चापडगाव या सर्व गावांचा शेतीपंपाच्या विजेचा मोठा प्रश्न होता . सतत वीजखंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होती.तसेच सिना उजवा कालवा आवर्तन वेळेस पाटाचे उचलपाणी मोटर चालत नव्हत्या.
या विद्युत उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा मिटल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते दीपक काकडे पाटील , माहीजळगाव व पंचक्रोशीतील शेतकरी , ग्रामस्थांनी व्यक्त केली
व सर्वांनी आमदार रोहित दादा पवार यांचे आभार मानले.

चौकट 2

लवकरच माहीजळगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपक काकडे पाटील यांनी दिली.