
आयबीपीएस द्वारा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दादा पाटील महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची निवड बँक प्रोबेशनरी ऑफिसरपदी झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये भरल्या जाणाऱ्या विविध अधिकारी पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. शिवम बाळु चव्हाण (बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर), भोंडवे देविदास नीलकंठ (बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक अधिकारी), बाळासाहेब जेजरथ शेंद्रे (बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक अधिकारी), संदेश सुशीलकुमार कांबळे (बँक ऑफ बडोदा मध्ये माहिती तंत्रज्ञान अधिकारी), स्वप्निल सोमनाथ लेकुरवाळे (सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक अधिकारी) अशा विद्यार्थ्यांची निवड नुकतीच झाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ३२ हून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग,आयबीपीएस व विविध स्पर्धा परीक्षांद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधुन वेगवेगळ्या पदांवर निवडले गेलेले आहेत.
आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीतील हे सर्वोच्च यश असून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी केले जाणारे नियमित मार्गदर्शन, महाराष्ट्रातील विविध तज्ञांची आयोजित केली जाणारी व्याख्याने, वातानुकूलित अभ्यासिका व विद्यार्थ्यांचे परिश्रम यामुळे गुणात्मक शिक्षणाचा आलेख व स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघ, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.






