अळसुंदे हायस्कूलमध्ये रंगला खेळ पैठणीचा

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल अळसुंदे विद्यालयात माता पालक संघाच्या वतीने हळदी कुंकू ,वाण वाटप आणि खेळ पैठणीचा असा अतिशय प्रभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील मातेचे स्थान लक्षात घेऊन सर्व मतांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्व समावेशक शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थी माता , पालक आणि शिक्षक हा त्रिवेणी संगम साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक माता पालकाचा सन्मान व्हावा, आयुष्यभर कुटुंबासाठी चालणाऱ्या धावपळीतून एक दिवस स्वच्छंदीपणे आनंदाने जगता यावा या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःच्या मुलाच्या किंवा मुलीच्या रोल नंबर नुसार बॅजेस ,विद्यार्थी निर्मित ग्रीटिंग कार्ड्स देऊन आणि वाण म्हणून विविध प्रकारची वाचनीय पुस्तके देऊन अनोख्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम सादर केला.

प्रत्येक महिलेने स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी दररोज करावयाचा व्यायाम आणि आहारातील बदल याविषयी प्रमुख व्याख्यात्या जागतिक आरोग्य सल्लागार सौ.अनुजा विशाल शिंदे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातील सकारात्मक विचारांनी अळसुंदे , देमनवाडी आणि परिसरातील महिला भारावून गेल्या.

स्वतःच्या कुटुंबासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला माजी प्राचार्या सौ. उल्का बाबासाहेब केदारे यांनी स्व: ची जाणीव करून दिली.

अळसुंदे गावच्या प्रथम महिला नागरिक सौ. स्मिता जिजाबापू अनारसे यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनातून महिला सबलीकरणास हातभार लागेल असे विचार मांडले.

खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सर्व माता पालक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि पैठणीच्या खेळाच्या पाचही राऊंडमध्ये सुयश संपादन केले त्यामध्ये प्रामुख्याने शितल मोहन गदादे, दिपाली संभाजी वाघमारे, उमा गोकुळ पवार, प्रियंका विठ्ठल वाघमारे, सुनंदा रामा खामगळ यांनी खेळाच्या राऊंड मध्ये पाच पैठणी साड्या जिंकल्या तर शेवटची मानाची पैठणी अश्विनी गजानन हुलगुंडे यांनी जिंकली.

माता पालक संघाचे सचिव सुनील अर्जुन गोरखे यांनी आयोजित केलेल्या या अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे सर्व माता पालकांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर, मोहन बनसुडे, सुनील गोरखे, रवींद्र विधाते, प्रवीण कांबळे व नितीन जगताप मनःपूर्वक अभिनंदन केले.