आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचा दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे उपक्रम

Google search engine

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि दादा पाटील महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय व्याख्यानमाला महाविद्यालयात संपन्न झाली. डॉ. दत्तात्रय घायतडक, सीओईपी कॉलेज, पुणे व श्री राहुल पावडे, आयसीटीसी, समुपदेशक, उपजिल्हा रुग्णालय कर्जत,अहिल्यानगर या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी व आरोग्य साक्षरताबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

डॉ. दत्तात्रेय घायतडक यांनी स्पर्धात्मक परीक्षा याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की आयुष्यामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची असते, वेळेचा जर सदुपयोग केला आणि आपले ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्गावर चाललो तर आपल्याला कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना कसलीही अडचण येणार नाही. कोणतीही स्पर्धा परीक्षा देतांना दडपण न घेता त्याच्या अभ्यासक्रमाप्रमाणे तयारी केली तर असाध्य गोष्टी साध्य होतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.

श्री. राहुल पावडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करताना, आरोग्य किती महत्त्वाचे आहे तसेच आपली दिनचर्या, आहार, जीवनात व्यायामाचे महत्त्व अशी वेगवेगळी उदाहरणे देऊन पटवून दिले. कोणत्या ऋतूमध्ये कोणता आहार घेतला पाहिजे, त्याचे महत्त्व काय आहे, तो आपण कसा आणि किती वेळा घेतला पाहिजे आदिंविषयी सखोल मार्गदर्शन केले. शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने त्यांनी आहाराचे महत्त्व विशद केले. सदृढ शरीर ही संपत्ती असून नियमित व्यायाम करून प्रत्येकाने आपले आरोग्य जपले पाहिजे असे मतही व्यक्त केले.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतात. या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, शिक्षण आणि सामाजिक जागरूकतेसाठी मार्गदर्शन करणे हा आहे.

व्याख्यानमालेतील व्याख्यान सत्रांचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय केंद्र कार्यवाह डॉ. आशा कदम, श्री प्रवीण घालमे यांनी केला. सदर कार्यक्रमाचे आभार डॉ.अशोक म्हस्के, डॉ. विकास भोसले यांनी मानले. डॉ. प्रतिमा पवार, यांनी या व्याख्यानसत्रांचे सूत्रसंचालन केले.