कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या २७ फेरीत पार पडणार 

0
1363
Google search engine

 

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार असून २७ फेऱ्यात ही मतमोजणी पार पडणार आहे.मतमोजणी साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून पहिला कल सकाळी ९ च्या दरम्यान हाती येणार आहे. कोण जिंकणार ? यासाठी गावागावांत मोठ्या पैजा लागल्या असून उमेदवारांनी आडाखे बांधले आहेत.

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार रोहित पवार यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहावयास मिळाली. प्रचारात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोपांची चिखलफेक केल्याने रंगत जास्तच वाढली. यात मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार रोहीत पवार यांच्यासोबत असणाऱ्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्याशी फारकत घेत आ.राम शिंदे यांच्याशी घरोबा केला. यामुळे यंदाची निवडणूक स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि सर्वसामान्य मतदार अशी रंगली गेली.

उद्या शनिवारी सकाळी आठपासून दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील बॅडमिंटन हॉलला ३५६ मतदान यंत्रांसाठी १४ टेबलवर एकूण २७ फेरीत मतमोजणी पार पडेल. यासह पोस्टल बॅलेट मतदान त्याव्यतिरिक्त ९ टेबलवर होईल. मतदान यंत्र आणि पोस्टल मतदानासह कर्जत-जामखेड विधानसभेसाठी एकूण २३ टेबलवर २७ फेरीत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली.

 

मतदान यंत्रांच्या स्ट्राँगरूमला पोलिस छावणीचे स्वरूप 

 

दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथील बॅडमिंटन हॉलला मतमोजणी पार पडणार आहे. त्या लगत असणाऱ्या जिम्नॅशियम हॉलमधील मतदान यंत्र स्ट्राँगरूमला तीन स्तरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला सीआरपीएफ तुकडी, इनरला एसआरपीएफ तुकडी आणि आउटरला स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे . विशेष म्हणजे या सर्वांवर ८ सीसीटीव्हीची नजर आहे. सामान्य व्यक्तीच्या प्रवेशासाठी सदरचा परिसर प्रतिबंधक( No Entry ) ठेवण्यात आला आहे .