
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत खांडवी ते टरमळवाडी रस्ताकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश मिळाला असताना काम सुरू झाले नाही. काम रखडल्यामुळे प्रवाशी , शेतमजूर , विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणांत हाल होत आहेत. हे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पोपट कांबळे यांनी केली.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी पाठपुरावा करून खांडवी ते टरमळवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण मंजूर करून घेतले. सभापती काकासाहेब तापकीर व ग्रामस्थांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सभापती राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात ११ रस्ते मंजूर केले. यामध्ये या रस्त्याचा समावेश होता. संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊन एक वर्ष झाले तरी रस्त्याचे काम सुरू केले नाही. सभापती राम शिंदे यांनी निधी देऊनही केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम रखडले.आहे. पावसाळ्यात या रस्त्याने ये-जा करणे अतिशय अडचणीचे होत आहे.
विद्यार्थी, शेतकरी, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे काम सुरू करावे, अन्यथा सभापती शिंदे यांच्याकडे दाद मागण्याचा इशारा पोपट कांबळे यांनी दिला.
खांडवी ते टरमळवाडी रस्ता तात्काळ पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.







