आत्माराम गांगर्डे यांनी निमगाव गांगर्डा गावचा झेंडा राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत अटकेपार फडकवला

Google search engine

 

17 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान 31 वी मास्टर टेबल टेनिस स्पर्धा इंदोर येथील अभय प्रशाल स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी भारतातील 18 राज्यातील सुमारे 800 खेळाडूंनी भाग घेतला होता . सदर स्पर्धेत श्री आत्माराम प्रभू गांगर्डे यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी या दोन्ही प्रकारात ब्राँझ मेडल पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटवला. त्यांना पुरुष दुहेरी मधील जोडीदार श्री. प्रसाद नाईक व मिश्र दुहेरी मधील जोडीदार मुनमुन मुखर्जी यांची मोलाची साथ लाभली.

श्री आत्माराम गांगर्डे हे नगर जिल्ह्यातील निमगाव (गांगर्डा ) या खेडेगावातील मूळ रहिवासी असून ते सध्या कल्याण येथे नोकरी निमित्त स्थायिक आहेत .त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरी मुळे त्यांनी निमगाव ( नगर ) व मोहने (कल्याण) या गावांचे नाव अटकेपार नेले. त्यांनी या खेळाची सुरवात इयत्ता ५ वी च्या वर्गात १० वर्षाचे असताना पासून एन आर.सी. स्पोर्ट्स क्लब मध्ये केली. त्यांना खेळाचा वारसा घरातूनच त्यांच्या मोठ्या भावंडांकडून मिळाला. मोठा भाऊ आबासाहेब प्रभू गांगर्डे उत्तम क्रिकेटपट्टू तर दुसरा भाऊ राजेंद्र प्रभू गांगर्डे हे राज्यस्तरीय धावपट्टू त्यामुळे घरातील वातावरण खेळासाठी पोषक होते. त्यांनी शालेय व राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत सतत ७ वर्ष महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच ब्राझील , स्वीडन, चीन,इंडोनेशिया,अमेरिका ,मंगोलिया ओमान व रोम येथील जागतिक मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आज पर्यंत उत्तम कामगिरी केली . त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेमध्ये खेळाडूंना राखीव असलेल्या जागेवर खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामंत्री अरुण दिवेकर यांनी प्रशस्त पत्रक देऊन त्यावेळी सत्कार केलेला आहे . त्यांच्या या नेत्र दीपक कामगिरीमुळे निमगाव गांगर्डा व मोहने गाव या परिसरातील नागरिक व खेळाडू यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टेबल टेनिस या खेळासाठी साठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा, मतिमंद आणि अपंग मुलांसाठी तसेच खेडेगावातील व तळागाळातील गरीब मुलांना या खेळाबाबत आवड निर्माण करून त्यातून उत्तम खेळाडू घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.