
“जे आवडतं, भावतं ते लिहिण्याचा प्रयत्न व्हायला हवा. रुळलेल्या वाटेने न जाता लेखनासाठी नवीन पायवाट तयार करावी. सत्य आणि कल्पिताचे मिश्रण साहित्यात करता आले पाहिजे. प्रत्येक गावांच्या आख्यायिकेतून सांस्कृतिक अनुबंध तपासता येतो. दहा हजार पाने इतरांची वाचून मग स्वतःचे एक पान लिहा” असे उद्गार प्रख्यात कवी डॉ. संतोष पद्माकर पवार यांनी व्यक्त केले.
ते दादा पाटील महाविद्यालयामध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२५’ निमित्त विद्यार्थी कल्याण मंडळ, मराठी विभाग व कर्मज्योती नियतकालिक विभाग या विभागांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘लेखन कौशल्य’ कार्यशाळेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर उपस्थित होते.
अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर येथील डॉ. संतोष पद्माकर पवार यांनी लेखन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जाणीवपूर्वक बदल केल्याशिवाय बदल घडत नाही. लेखन करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांद्वारे साहित्य लेखनाला प्रोत्साहन मिळते. लेखनासाठी स्वतःची परिभाषा निवडा. ‘माझे आजोळ’ सारखे विषय घेऊन लेखनाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करा. लेखनावर संस्कार केल्यानंतर कलाकृती घडते. लोकांचे चांगले ऐकले की लेखन सुचते. लेखनाचा समाजावर परिणाम होत असतो, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, कवी मन अस्वस्थ असेल तरच दर्जेदार कलाकृती निर्माण होत असते. वाचन, चिंतन व निरीक्षण यातून साहित्य व कवी घडतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे कवीची घालमेल होत असते. भावनांना कवी शब्दरूप देत असतो. साहित्य हे जीवनावरील भाष्य आहे. साहित्याने समाजाला जागे करण्याचे काम केलं आहे. संवेदनशील मनातून साहित्याची निर्मिती होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यशाळेसाठी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. भागवत यादव, कर्मज्योती नियतकालिकाचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘कर्मज्योती’ नियतकालिकाचे संपादक व मराठी विभागप्रमुख प्रा. सुखदेव कोल्हे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा डोके यांनी केले. आभार विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक प्रा. सागर शिंदे यांनी मानले.







