दादा पाटील महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

0
219
Google search engine

 

कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयास नुकताच झेप आंतरराष्ट्रीय फाउंडेशन मुंबई यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. महाविद्यालयाने ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर राबवलेल्या विविध उपक्रमांची नोंद घेऊन सदर पुरस्कार ‘आंतरराष्ट्रीय डिजिटल डेटॉक्स डे’ निमित्त महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या प्रांगणात देण्यात आला.

 

मोबाईलमुळे आज मानवी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे. तसेच तरुणांमध्ये मोबाईलचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे त्यामुळे नैराश्य, हिंसाचार यासारख्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत प्रबोधन करण्याचे कार्य झेप आंतरराष्ट्रीय फाउंडेशन ही संस्था करते. संस्थेचे कार्य जगातील ७० हून अधिक देशात चालते. या संस्थेचे ७५ लाख सदस्य जगभरात कार्य करीत आहे.

 

दादा पाटील महाविद्यालयाने गेल्या दोन वर्षापासून झेप संस्थेच्या माध्यमातून विविध व्याख्याने, मूकनाट्य, शपथ अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोबाईलच्या व्यसनापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे यासाठी सतत प्रयत्न केले जात आहे. त्याची नोंद घेऊन झेप फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष रेखा चौधरी व समन्वयक वैशाली चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार महाविद्यालयास प्रदान केला आहे.

 

आंतरराष्ट्रीय डिजिटल डेटॉक्स डे निमित्त त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय मुंबई या ठिकाणी हा पुरस्कार महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी, आय.क्यू.ए.सी चे प्रमुख डॉ. संदीप पै, प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी द लिरिस्ट ऑफ चेंज अवॉर्ड कौशल किशोर, सामाजिक प्रभावासाठी ब्रेक थ्रू परफॉर्मर प्रणव मिश्रा, द सस्टेनेबल स्टाईल इनोव्हेटर रिक रॉय, ब्रेक थ्रू ग्लोबल आयकॉन अपेक्षा पोरवाल, द डिटॉक्स फॅशन आयकॉन साहिल सलाठिया, मानसिक आरोग्य जागरूकता चॅम्पियन दारासिंग खुराणा, ब्रेकआऊट डिजिटल स्टार जितीन गुलाटी, माजी आमदार शिरीष चौधरी व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 

दादा पाटील महाविद्यालयातील खराडे कार्तिक, शिंदे प्रकाश, पवार अजित, कोकाटे कल्याणी, काळे अशिता, महानवर वैशाली या विद्यार्थ्यांनी प्रा. स्वप्निल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार वितरण ठिकाणी सादर केलेल्या मूकनाट्याने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सहभागी विद्यार्थ्यांनाही झेप संस्थेमार्फत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

महाविद्यालयाला मिळालेल्या या सन्मानाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले