कर्जतला सीआरपीएफ १०७ बटालियन आणि कर्जत पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शहरात पथसंचलन

निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासह मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भीडपणे पार पडावी यासाठी सीआरपीएफ १०७ बटालियन आणि कर्जत पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शहरात शनिवारी सकाळी पथसंचलन झाले.प्रशासनाची विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी सुरू आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घड्डू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
मतदारांनी देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी निर्भीडपणे शांततेत मतदान पार पाडण्यासाठी शनिवारी (दि.९) सकाळी ११ वाजता सीआरपीएफ १०७ बटालियन आणि कर्जत पोलिस विभागाच्या वतीने कर्जत बसस्थानक, नगर-बारामती मुख्य रस्ता, बाजारपेठ, म्हसोबा गेट, लोहारगल्ली, आलमगीर मशीद, संत सद्गुरू गोदड महाराज गल्ली आदी भागातून पथसंचलन करीत पोलिस विभाग सतर्क असल्याची ग्वाही सर्वसामान्य नागरिकांना दिली.
यावेळी सीआरपीएफचे असिस्टंट कमांडर नंदीबाबू, कर्जतचे पोलिस निरीक्षक मारुती मुलूक, पोलिस उपनिरीक्षक रमीज मुलानी, महादेव कोहक, दीपक कोल्हे, नितीन ढवळे यांच्यासह स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झाले होते. याआधी देखील २९ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्जत शहरात आणि तालुक्यात आयटीबीपीच्या पथसंचलन केले होते. जवानांनी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यासह कर्जत-जामखेड मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्वांनी त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. खासकरून निवडणूक आणि प्रचारादरम्यान सोशल मीडियावर सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट कोणीही करू नयेत. सायबर पोलिस विभागासह स्थानिक पोलिसही यावर लक्ष ठेवून आहेत. कायदा मोडणाऱ्या आणि हाती घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पोलिस निरीक्षक मारुती मुलूक यांनी सांगितले.







