
बाभुळगाव खालसा येथील कुमारी श्रेया राजेंद्र खेडकर ही इयत्ता दुसरी मध्ये वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी येथे शिकत आहे. श्रेयाचे वडिल प्राथमिक शिक्षक असल्याने ते आष्टी येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून आष्टी येथेच राहत आहेत. कुमारी श्रेयाने काही महिन्यापूर्वीच मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२४ मध्ये १५०पैकी १४८ गुण घेऊन इयत्ता दुसरी मध्ये महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचे बक्षीस वितरण मराठी मालिका मिसेस मुख्यमंत्री यातील अभिनेत्री अमृता धोंगडे यांच्या हस्ते अहिल्यानगर येथे देण्यात आले. आता पुन्हा एकदा श्रेयाने राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा (IAS) -२०२४ मध्ये १५० पैकी १४६ गुण घेऊन महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल मार्गदर्शक वर्गशिक्षिका सौ.वर्षा जाधव मॅडम व संस्थेचे संस्थाचालक आदरणीय श्री मनोरंजन धस साहेब यांचे पालकांनी आभार व्यक्त केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच श्रेयाला हे यश मिळाल्याचे पालकांनी सांगितले.






