मुलगी जन्माला आली की ‘वेलकम बेबी गर्ल किट’ – पवार हॉस्पिटलचा उपक्रम

0
319
Google search engine

मुलगी हीच खऱ्या अर्थाने घरातील लक्ष्मी, समृद्धी आणि सुखशांती घेऊन येते, या भावनेतून कर्जत शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये नवजात मुलींच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून राबवला जात आहे.

डॉ. दयानंद पवार आणि डॉ. श्वेता पवार या दाम्पत्याने “मुलगी झाली की वेलकम बेबी गर्ल किट” हा उपक्रम सुरू केला असून आतापर्यंत ४०० हून अधिक नवजात मुलींना हे किट देण्यात आले आहे. या किटमध्ये बाळासाठी आवश्यक वस्तूंसह जगभरातील कर्तृत्ववान महिलांची माहिती असलेली आकर्षक पुस्तिका दिली जाते. या पुस्तिकेमुळे पालकांचा मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो.

आजही अनेक ठिकाणी मुलगा जन्माला आला की उत्सव साजरा होतो, परंतु मुलगी झाली की नाराजी व्यक्त केली जाते. दुसऱ्यांदा मुलगी झाली तर मातेलाच दोष दिला जातो. काही विकृत घटनांमध्ये नवजात मुलींना टाकल्याच्या बातम्याही दिसतात. एकीकडे समाजात बायको, बहिण, मुलगी हवी असते, तर दुसरीकडे मुलगी जन्माला नको ही मानसिकता ही मोठी विसंगती आहे. या मानसिकतेत बदल घडवण्यासाठीच हा उपक्रम राबवला जात आहे.

डॉ. श्वेता पवार म्हणाल्या, “मुलगी असो वा मुलगा – दोन्हीही आई-वडिलांचे सुख, समृद्धी आणि आयुष्याचे खरे वैभव आहेत. मुलगी झाली की नाराजी व्यक्त करणे म्हणजे आई, पत्नी आणि बहिणीसारख्या नात्यांचा अपमान आहे.”

डॉ. दयानंद पवार यांनी सांगितले, “आजवर आम्ही ४०० हून अधिक मुलींच्या जन्मावेळी पालकांशी समुपदेशन केले आहे. त्यातून समाजात सकारात्मक बदल होत असल्याचे दिसते. मुलगी जन्माचे स्वागत करणे ही काळाची गरज बनली आहे.”

हा उपक्रम केवळ वैद्यकीय सेवापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक जागृतीचा मोठा भाग ठरत आहे. मुलगी नकोशी नसून अभिमानाची असावी, हा संदेश समाजात पोहोचवणे हीच पवार दांपत्याची ध्येयवेड आहे.