
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘आदर्श लोकनेता मा. शरदचंद्र पवार साहेब’ या विषयावर डॉ. प्रदीप जगताप यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाला दीपकशेठ शिंदे, राजेंद्र तनपुरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
याप्रसंगी बोलताना डॉ. प्रदीप जगताप म्हणाले की, मुस्लिम धर्मातील सनातनी प्रथांना विरोध करणाऱ्या हमीद दलवाई यांना सहकार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणे, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय, कृषी विज्ञान केंद्राची संख्या भरातभर वाढवणे, महिला सबलीकरण, महिला बचत गटाची चळवळ तसेच कुस्ती, क्रिकेट, कबड्डी या खेळाला चालना दिली. किल्लारी भूकंप, गुजरात भूकंप व १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोटामध्ये त्यांनी उत्तम व्यवस्थापन केले. गोविंदराव पवार व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते. तोच वारसा जपत १९८९ साली रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाल्यानंतर गुणात्मक व संख्यात्मक वाढ करण्यावर त्यांनी महत्त्वपूर्ण भर दिला. संगणकाचे शिक्षण, लँग्वेज लॅबची स्थापना, टाटा कन्सल्टन्सी सोबत करार, स्पर्धा परीक्षा केंद्रांची उभारणी, रयत विज्ञान परिषदेची स्थापना आदि महत्त्वपूर्ण शैक्षणिक धोरणे त्यांनी राबवलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये ३०० पेक्षा अधिक तलाव खोदले, आज तिच योजना जलयुक्त शिवार बनली. कृषी विज्ञान केंद्राची बारामतीला स्थापना केली. याशिवाय दुग्ध, मधमाशी, कुक्कुटपालन, मच्छी पालन असे शेतीपूरक व्यवसायाला चालना दिली. खेड्यापाड्यापर्यंत कृषी सेवा केंद्र पोहोचवली. पूर्वी आजारी पेशंटलाच फक्त फळे मिळायची, या फाळांची उपलब्धता वाढवली. भारताला अन्नधान्य आयात करावे लागायचे परंतु शरद पवार यांच्या कामगिरीमुळे भारताने अन्नधान्याची निर्यात वाढवली. शेतीमालाला योग्य भाव देण्याचीही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
डॉ. संजय नगरकर यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, शरद पवार हे अष्टावधानी नेतृत्व असलेले नेते असल्याचे सांगितले. १९८९ साली त्यांनी रयत शिक्षण संस्थेअंतर्गत सातारा, सोलापूर, उंब्रज, अहिल्यानगर येथे महिला महाविद्यालयाची सुरुवात केली. हिमालयाच्या उंचीचे असणारे हे व्यक्तिमत्व कायम वैचारिक पेरणी करत गेले. इंटरऍक्टिव्ह पॅनलद्वारे शिक्षण देण्याचा आज रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रयत्न सफल होतो आहे. अनेक संकटे पचविलेला हा दृष्टा नेता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक विभागाच्या वतीने या व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद परदेशी, आभार प्रा. सुनील देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रा स्वप्नील म्हस्के यांनी केले






