
दादा पाटील महाविद्यालयामध्ये आषाढी वारीनिमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग आयोजित ‘विद्यार्थी-शिक्षक कीर्तन महोत्सव’ शनिवार दि. ६ जुलै ते बुधवार दि. १० जुलै २०२४ या कालावधीत महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे.
या कीर्तन महोत्सवामध्ये महाविद्यालय विकास समिती, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच महाविद्यालयात शिकत असणारे व शिकलेल्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तन होणार आहेत. कीर्तनकार, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी अशा सगळ्या भूमिका आजी- माजी विद्यार्थी करणार आहेत
शनिवार दि. ६ जुलै रोजी ह.भ.प. शांतीलाल महाराज जंजीरे, रविवार दि. ७ जुलै रोजी ह.भ.प. युवाकीर्तनकार आदेश महाराज हरिहर, सोमवार दि. ८ जुलै रोजी ह.भ.प. युवाकीर्तनकार औदुंबर महाराज थेरवडीकर, मंगळवार दि. ९ जुलै रोजी ह.भ.प. युवाकीर्तनकार तेजश्री महाराज दिंडे यांची कीर्तने होणार आहेत.
बुधवार दि. १० जुलै रोजी ‘डोंगरगण ते पंढरपूर पायी पालखी सोहळा’ महाविद्यालयात विसाव्याला असणार आहे. सदर दिवशी ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री यांचे कीर्तन महाविद्यालयात संपन्न होणार आहे
विद्यार्थ्यांवर मूल्यसंस्कार घडावेत, मुलांचे समाजिक व आध्यात्मिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.
कीर्तन संपल्यानंतर कॉलेजमध्येच रोज संध्याकाळी सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व वारकरी संप्रदायप्रिय कर्जत ग्रामस्थांनी या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय नगरकर व सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले आहे







