
बाभुळगाव खालसा येथील ज्येष्ठ शिक्षणप्रेमी व माजी शिक्षक श्री. ज्ञानदेव रामचंद्र पाबळे (सर) उर्फ “बाप्पू” यांनी जपलेल्या शिक्षणसंस्कारांना जागतिक स्तरावर आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. त्यांची नात तथा डॉ. प्रा. मच्छिंद्र जगन्नाथ पाबळे यांची कन्या *कु. ऋतुजा पाबळे हिची प्रतिष्ठित ThinkSwiss Research Internship 2026–27 साठी निवड झाली असून, देशभरातून निवड झालेल्या अवघ्या सहा विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत संगणक अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या ऋतुजा पाबळे या दोन महिन्यांच्या संशोधन इंटर्नशिपसाठी स्वित्झर्लंड येथे रवाना झाल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पाबळे परिवारासह संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्ञानदेव पाबळे (सर) यांनी जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, गढी (ता. गेवराई, जि. बीड) येथे अनेक वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावली.* सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मूळ गावी परत येऊन सरपंच तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. मात्र, त्यांची खरी ओळख शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणारे शिक्षणप्रेमी अशीच राहिली.
स्वतःच्या शिक्षणात आलेल्या अडचणींचा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी आपल्या एकत्र कुटुंबातील प्रत्येक मुलाच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. *त्यांनी पुतणे मच्छिंद्र यांना आठवीपासून आणि नितीन यांना पहिलीपासून स्वतःकडे ठेवून त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या दूरदृष्टी, शिस्त आणि शिक्षणावरील निष्ठेमुळे आज कुटुंबातील अनेक सदस्य उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत आहेत.
कुटुंबातील डॉ. प्रा. मच्छिंद्र जगन्नाथ पाबळे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, आवसरी (पुणे) येथे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. नितीन नामदेव पाबळे हे परांडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दिपक ज्ञानदेव पाबळे हे पुणे येथे आयटी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. डॉ. सुषमा जंजीरे-पाबळे या श्रीगोंदा येथील जंजीरे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देत असून, डॉ. ज्योती चाळक-पाबळे या अहमदनगर येथे होमिओपॅथी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे पुतणे जालिंदर पाबळे आणि काका पाबळे हे शेती व्यवसायातून कुटुंबाची परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत.
शिक्षणाची ही परंपरा पुढील पिढीतही तितक्याच जोमाने सुरू आहे. डॉ. प्रा. मच्छिंद्र पाबळे यांचे चिरंजीव यांनी आयआयटी धारवाड येथून संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची तयारी केली आहे. तर वर्षा जालिंदर पाबळे यांनी संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन केले असून, कुटुंबातील इतर विद्यार्थीही उच्च शिक्षणाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहेत.या यशामागे केवळ ज्ञानदेव पाबळे (सर) यांचे शिक्षणावरील प्रेमच नव्हे, तर संपूर्ण पाबळे कुटुंबाची एकजूट, त्याग आणि परस्पर सहकार्यही तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. त्यांचे बंधू श्री. जगन्नाथ पाबळे आणि श्री. नामदेव पाबळे यांनी शेतीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले. ज्ञानदेव पाबळे (सर) यांनी शिक्षणाची धुरा सांभाळली, तर त्यांच्या बंधूंनी शेती आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यामुळे कुटुंब अनेक वर्षे एकत्र राहिले आणि प्रत्येक मुलाला उच्च शिक्षणाची समान संधी मिळाली.
या संपूर्ण प्रवासात सौ. सत्यभामा ज्ञानदेव पाबळे (नानी) यांनी कुटुंबातील सर्वांचा सांभाळ करत ज्ञानदेव पाबळे (सर) यांना खंबीर साथ दिली.* त्याग, संयम आणि कुटुंब एकत्र ठेवण्याची त्यांची भूमिका या यशामागील महत्त्वाचा आधारस्तंभ ठरली.
आज या कुटुंबातील सदस्य डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, अभियंते, संशोधक आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हणून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहेत. त्यामुळे कु. ऋतुजा पाबळे यांची ThinkSwiss Research Internship साठी झालेली निवड ही केवळ एका विद्यार्थिनीचे यश नसून, तीन पिढ्यांनी जपलेल्या शिक्षणसंस्कारांची, कुटुंबाच्या एकजुटीची, परिश्रमांची आणि त्यागाची फलश्रुती असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
देशातील अवघ्या सहा विद्यार्थ्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी म्हणून झालेल्या या निवडीमुळे पाबळे परिवाराचा तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव झाला आहे. कु. ऋतुजा पाबळे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, *ज्येष्ठ शिक्षणप्रेमी ज्ञानदेव पाबळे (सर), डॉ. प्रा. मच्छिंद्र जगन्नाथ पाबळे आणि संपूर्ण पाबळे परिवाराने जपलेला शिक्षणाचा आदर्श आज अनेक कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.*






