कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांना दिवसा थ्री-फेज वीज दया, भाजपा तालुका सरचिटणीस नंदलाल काळदाते यांची मागणी, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण – पिके वाचवण्यासाठी प्रशासनाकडे साकडे

0
123
Google search engine

 

कर्जत तालुक्यात सध्या बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती कामकाजावर होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतात जाणे अत्यंत धोकादायक बनले असून शेतकरी मोठ्या भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत सध्या सुरू असलेला थ्री-फेज वीजपुरवठा रात्री १० ते सकाळी ६ आणि दिवसा ८ ते ४ या वेळेत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी घराबाहेर पडू शकत नाहीत. परिणामी शेताला पाणी देणे, पंप सुरू करणे, शेतीतील देखरेख करणे हे सर्व कामे ठप्प झाली आहेत. याचा थेट फटका शेती पिकांना बसत असून पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

यातच यंदा झालेल्या अतीवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके आधीच वाया गेली आहेत. या नैसर्गिक संकटातून सावरत असतानाच आता बिबट्याच्या वावरामुळे आणि रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे उरलेली पिकेही धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, कर्जत यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात थ्री-फेज वीजपुरवठा पहाटे ५ ते दुपारी १२ आणि दुपारी १२ ते सायंकाळी ७ या पूर्णपणे दिवसा वेळेत देण्यात यावा, अशी कळकळीची मागणी करण्यात आली आहे. दिवसा वीजपुरवठा मिळाल्यास शेतकरी निर्भयपणे शेतीची कामे करू शकतील, पिकांना वेळेवर पाणी देऊ शकतील आणि होणारे नुकसान टाळता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ही मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती पिकांचे संरक्षण होण्यास मदत होईल. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.