
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आणि देशाचे माननीय नेते मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. “श्रेष्ठदानचे कर्तव्य पार पाडू या… चला रक्तदान करू या…” या प्रेरणादायी संदेशातून शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायं. ५.०० या वेळेत बेनवडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर श्री भैरवनाथ कॉम्प्लेक्स, राशिन रोड, शिरसाई माता मंदिरासमोर, बेनवडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे पार पडणार असून परिसरातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्ताची कमतरता भासणाऱ्या रुग्णांना जीवनदान मिळावे, समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढावी आणि तरुणांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. वाढदिवस साजरा करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवाला मदत होईल असा उपक्रम—या भावनेतून हा कार्यक्रम दिमाखात आयोजित केला जात आहे.
शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक ट्रॅकसूट भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे युवक, नागरिक आणि समाजातील सर्व घटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सामाजिक उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान मा. श्री. पोपटराव धुमाळ, सरपंच बेनवडी–कोळवडी असून त्यांच्याच संकल्पनेतून मित्र परिवार, बेनवडी’ तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामविकासाबरोबरच सामाजिक जाणिवा जोपासण्याचे ध्येय त्यांनी नेहमीच जपले असून त्याचे प्रत्यंतर या भव्य रक्तदान शिबिरातूनही येत आहे.
स्थानिक नागरिक, शेतकरी, महिला मंडळे, युवक मंडळे तसेच सर्व सामाजिक संघटनांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते आणि एका रक्तदात्यामुळे तीन जणांचे प्राण वाचू शकतात, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक असल्याचेही कळविण्यात आले आहे.
बेनवडी व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







